सणबूर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील राजकारणात महत्वपुर्ण समजल्या जाणाºया ढेबेवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी प्रथमच सरपंच निवड जनतेतुन होत असल्याने स्थानिक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असुन सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापु लागले आहे.
ढेबेवाडी हे व्यापाºयांचे गाव म्हणुन ओळखले जाते. या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणी राष्ट्रवादी यांच्यातच कायम सत्तासंघर्ष पहावयास मिळत होता. कॉग्रेसने कधी शिवसेनेबरोबर तर कधी राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करून निवडणुका लढल्या आहेत. मात्र, सध्या येथील राजकारण बदलत असल्याचे चित्र असुन सरपंच निवड थेट जनतेतुन होत असल्याने येथे तीन पॅनेल रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे सेथील राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यात तापु लागल्याचे दिसत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशिल व पाटण तालुक्याच्या राजकारणात महत्वाची ग्रामपंचायत म्हणुन ढेबेवाडी ग्रामपंचायतीकडे पाहीले जाते. त्यामुळे या ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी सर्वच पक्षानी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
काँग्रेस व शिवसेनेला अडवण्यासाठी राष्ट्रवादीने येथे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार फिल्डींग लावली आहे . तर गेली पाच वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेने गावात लाखो रूपयाची विकासकामे मार्गी लावुनही जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीत ढेबेवाडीत सेनेचे मतदान घटल्याचे चित्र आहे. यावर गावपातळीवर शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रीत विचारमंथन करायला हवे. विकासकामे करूनही ग्रामस्थांची नाराजी का ओढवली, याचा विचार व्हायला हवा.
ढेबेवाडी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असुन जिल्हा परिषद निवडणुकीत गावातून सर्वाधिक मतदान मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ढेबेवाडीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भुमिका घेतल्याचे समजते. मात्र, राष्ट्रवादीचा वारू अडवायचा असेल तर सेना आणी काँग्रेसने एकत्र यायला हवे, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.