सातारा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे यासह विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठा थांबणार असून कचराही साठणार आहे. तर बंदमधील कर्मचाऱ्यांनी मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून घोषणाबाजी केली. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये राज्य अध्यक्ष राजन लिंगाडे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रभाकर नेवसे, कार्याध्यक्ष रमेश भोसले, सचिव रनजित वरखडे, प्रसिद्धीप्रमुख जे. के. काळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. याबाबत जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील हजारो ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कामगार, पाणीपुरवठा अन् वीजपुरवठा तसेच लिपिक पदावर अनेक कामगार काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. त्यावेळी आश्वासन देण्यात आले. परंतु त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे २६ ते २९ फेब्रुवारी यादरम्यान राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी, निवृत्त वेतन अन् उपदान लागू करावे. वेतनासाठी लाभलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी, आकृतीबंध सुधारणा कराव्यात. जिल्हा परिषद सेवेत एकूण रिक्तच्या दहा टक्के जागांवर आणि वर्ग तीन व चारच्या पदावर नियुक्ती करावी अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात. यासाठी आंदोलन करत आहोत.दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतच्या कामावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांनी पाणी सोडणे बंद केले आहे. तसेच दिवाबत्ती आणि स्वच्छतेचे कामही थांबवण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीशी सामना करावा लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; जिल्हा परिषदेसमोर निदर्शने अन् घोषणाबाजी
By नितीन काळेल | Published: February 26, 2024 4:45 PM