खंडाळा : कोरोनासारख्या विषाणूशी लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आपल्या गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागावर अवलंबून न राहता खंडाळा तालुक्यातील म्हावशी ग्रामपंचायतीने स्वतःचे इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सिमीटर खरेदी करून स्वतः ग्रामपंचायत सदस्यांनी घरोघरी तपासणी सुरू केली आहे.जिल्ह्यात उल्लेखनीय काम असलेल्या या गावातील ग्रामपंचायत सदस्यच लोकांच्या आरोग्यासाठी मैदानात उतरून उचललेले पाऊल निश्चितच आदर्शवत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचे नवीन आदेश दिले असल्याने खंडाळा तालुक्यातील बहुतांशी व्यवहार बंद आहेत.
म्हावशी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सरपंच कृष्णात भुजबळ, उपसरपंच विनोद राऊत, सदस्य बापूसाहेब राऊत, सुषमा माळी, प्रज्ञा जावळे, जयश्री पवार, विजया राऊत, ग्रामसेवक मल्हारी शेळके, आरोग्य सेविका छाया होले, आशा सेविका शोभा राऊत, अंगणवाडी सेविका अलका राऊत, सारिका पिसाळ यांनी संयुक्त बैठक घेऊन गावची विशेष काळजी घेण्याचे निश्चित केले.
विशेषतः ग्रामीण भागात गावातून सर्वत्र भीतीयुक्त शांतता दिसून येते. अशा परिस्थितीत गावातील लोकांची आरोग्यविषयक देखभाल घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इन्फ्रारेड थर्मामीटर व ऑक्सिमीटर खरेदी करून त्याद्वारे थर्मल तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. दररोज ग्रामपंचायतीचे सदस्य व अंगणवाडी सेविका ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
गरज भासल्यास आवश्यक औषधोपचार करण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे कोरोनाच्या काळात गाव पातळीवर घेतली जाणारी काळजी इतर गावांना दिशा देणारा उपक्रम ठरत आहे. तसेच हे काम पाहणारे कर्मचारी यांना सॅनिटायझर, हँडग्लोज व मास्क ग्रामपंचायतीने उपलब्ध करून तालुक्यात आदर्शवत काम करून इतर गावांना दिशा दाखविण्याचे काम केले आहे.
कोरोनाची भीती वाडी-वस्तीवर पसरली आहे. छोट्या गावातील लोक काळजीत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी गावातच त्यांच्या तापमानाची तपासणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार गावातच तपासणी सुरू झाल्याने प्राथमिक अवस्थेतील रुग्ण लक्षात येणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रसार होण्यास प्रतिबंध होईल, याचे ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.-कृष्णात भुजबळ,सरपंच, म्हावशी