कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीची विचारधारा मानणारा आहे. याची प्रचीती ग्रामपंचायत निवडणूक निकालातून आली आहे. विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी याची प्रचीती आली. त्यामुळे कोणी टिमकी वाजवू नये. राष्ट्रवादीच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.
ल्हासुर्णे येथील निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली कोरेगाव आणि सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सदस्यांचा सत्कार आ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत दगाफटका झाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एका निवडणुकीत पराभव झाल्याने आम्ही खचून जाणाऱ्यांपैकी नाही. सामान्य कार्यकर्ता मोठा होत असताना, त्याला अडविण्याचे काम जिल्ह्यातील काही जणांकडून केले जात आहे, त्याला घाबरत नाही. बेरजेचे राजकारण करत असताना नेहमीच सर्वसामान्यांच्या हितालाच प्राधान्य दिले आहे. गेल्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर झाला, साम-दाम-दंड-भेद असे प्रकार झाले, त्यांची तेव्हा सत्ता होती. म्हणून सर्व शक्य झाले. मात्र, आता जनतेला कळून चुकले आहे. एका वर्षातच मतदारसंघातील चित्र पूर्णत: बदलले आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालातून ते स्पष्ट होत आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा कुटुंबातील घटक आहे, हे मानून प्रत्येकाला ताकद दिली जाणार आहे. विकासकामांद्वारे मतदारसंघाचे चित्र बदलून दाखवू.
अरुण माने म्हणाले, विरोधकांनी महाआघाडीच्या सूत्रालाच खोडा घातला आहे. भोसेसारख्या गावात धनशक्तीचा वापर करण्यात आला, मात्र जनतेने सलग दहा वर्षे ग्रामपंचायत ज्यांच्या हातात होती, त्यांच्या हातात पुन्हा पाच वर्षांसाठी बहाल केली आहे. त्यामुळे विरोधकांनी आता लक्षात घ्यावे, की आगामी निवडणुकीत भोसे गावापासून आणि कुमठे पंचायत समिती गणापासून त्यांना विरोध केला जाणार आहे.
चौकट :
हलगीच्या निनादात स्वागत
सकाळपासून हलगीच्या निनादात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचे स्वागत केले जात होते. अक्षरश: परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. कोरेगाव, सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वाहनांमुळे कोरेगाव-सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांना धाव घ्यावी लागली.