मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायतची ग्रामसभा विविध विषयांवरुन वादळी ठरली. यावेळी गावात दारुबंदीचा ठराव घेण्याकरीता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे याबाबतचा ठराव घेण्यात आला. या ठरावामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. तर गट क्रं.655 हा शासनाने भाडेतत्वावर न देता सार्वजनिक हिताकरीता राखीव ठेवण्याचा ठराव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच रविराज दुधगावकर होते. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र तांबे, गुरुदेव बरदाडे, शिरवळ उपसरपंच ताहेर काझी, ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. विविध विषयांवरुन सभा वादळी ठरली.यात सदनिकांचे, गाळेधारकांचे तसेच ग्रामपंचायतच्या मिळकतींची फेरसर्व्हे, घनकचऱ्याचा प्रकल्प गट क्रं.655 मध्ये करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी शासनाकडून आलेल्या प्लास्टिक निर्मुलन प्रकल्प राबवित शिरवळला प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. सांडपाण्याचा प्रश्नही नवनिर्वाचित सरपंच रविराज दुधगावकर यांनी व नवनियुक्त सदस्य यांनी निकाली काढण्याचा ठराव करण्यात आला आहे.दरम्यान, सुभानमंगल किल्ल्याच्या प्रश्नावरुन खंडाळा पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र तांबे व महादेव कांबळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याने गावात दारुबंदीचा निर्णय घेण्याकरीता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा ठराव जनता फाऊंडेशनचे इम्रान काझी व अंजिक्य कांबळे यांनी मांडत ठराव संमत केला.
Satara News: शिरवळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी, दारुबंदीसाठी विशेष सभा घेण्याचा ठराव संमत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 6:27 PM