सातारा : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्वाची बैठक शुक्रवारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे. यामध्ये युतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तर याच बैठकीतच रविवारी साताऱ्यातील महामेळाव्याचे नियोजना होणार असून यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवार कोण यापेक्षा आघाडी किंवा महायुती भक्कम दाखविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळेच एक महिन्यापूर्वी महाविकास आघाडीची बैठक साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झाली होती. त्यानंतर महायुतीनेही आम्हीही मागे नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या अनुषंगानेच युतीतील नेत्यांची बैठक शुक्रवार, दि. १२ रोजी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर होत आहे. या बैठकीला युतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, प्रमुख नेते, पदाधिकारी यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी दोनला होणाऱ्या बैठकीत सर्वांचा एकी दाखविण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच याच बैठकीत साताऱ्यात रविवार, दि. १४ जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याचे ठिकाण, दिशा ठरविण्यात येणार आहे. हा मेळावा मोठ्या स्वरुपात घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे जबाबदाऱ्याही देण्यात येणार आहेत. या मेळाव्यातून एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.
तिघांचाही साताऱ्यावर दावा; कोणाला मिळणार मतदारसंघ...
महायुतीत भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादीचा अजित पवार गट, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आहे. तसेच रिपाइं (आठवले गट) आहे. भाजप, सेना आणि राष्ट्रवादी या तिघांनाही सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढायची आहे. भाजपने तर दोन वर्षांपासून तयारी केली आहे. त्यातच मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यावर दावा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनीही युतीत मतदारसंघ आमच्याकडे असल्याचे सांगत निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जागा वाटपात मतदारसंघ कोणाकडे जातो हे नंतर ठरणार आहे. पण, त्यापूर्वी सर्वजण एकत्र येणार आहेत हेही महत्वाचे ठरलेले आहे.