पुसेगाव : पुसेगाव येथील रघुनाथ काशिनाथ गुरव या नव्वद वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली. केवळ पंधरा दिवसांमध्ये ते ठणठणीत बरे झाले.
घरात मुलाला कोरोना झाला. सर्वतोपरी काळजी घेऊनही दि. ५ मे रोजी वयोवृद्ध रघुनाथ काशिनाथ गुरव यांच्या तोंडाची चव जाऊन श्वसनाचा त्रास होऊ लागला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तसेच एचआरसीटी करण्यात आला. त्यामध्ये स्कोर ८ आल्याने कुटुंबावर संकट कोसळले. वयाच्या ९० व्या वर्षात कोरोना संक्रमित झाल्याने घरचे सर्व चिंतेत होते.
सुरुवातीला गुरव कुटुंबीयांनी आजोबांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नव्वद वर्षीय आजोबांनी कोरोनावर रुग्णालयात उपचार घेताना चार दिवसात तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याने कुटुंबीयांनी घरामध्येच अलगीकरणात विवेक गायकवाड यांच्या देखभालीखाली उपचार सुरू ठेवले. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घेणे व सकस आहारावर जोर देणे हा पॅटर्न तंतोतंत पाळला.
त्यामुळे ९० वर्षांच्या आजोबांनी कोरोनाविरोधात लढत त्यावर केलेली मात ही नक्कीच प्रेरणादायी व अन्य कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा देणारी आहे.