सातारा : स्वत:च्या संसारात अडचण नको म्हणून पोटच्या लेकरांनी वृद्धाश्रमात ठेवलेल्या आजी-आजोबाना खऱ्या अर्थाने ‘सोशल व्हॅलेंटाईन’चा अर्थ कळाला. शाळेच्या सहलीतून वाचलेल्या पैशाचा पुरेपूर उपयोग करत या आजी-आजोबांना शनिवारी दिवसभर निसर्ग सहल घडवून आणण्यात आली. डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांनी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’मध्ये भाग घेऊन जगासमोर ठेवला एक अनोखा आदर्श. गौरीशंकर नॉलेज सिटीच्या डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलने नुकतीच विद्यार्थ्यांसाठी सहल काढली होती. या सहलीतून काही पैशांची बचत झाली होती. या उरलेल्या पैशांचे काय करायचे, हा प्रश्न मनात असतानाच ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘सोशल व्हॅलेंटाईन’ याविषयीचे वृत्त वाचून महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना निसर्ग सहल घडविण्याची कल्पना समोर आली, त्यानुसार वृद्धाश्रमातील बोरगाव, ता. सातारा येथील आनंद कृषी पर्यटन केंद्र येथे सहलीचे नियोजन केले. शाळा व्यवस्थापनाकडून अजून काही पैसे घेतले आणि २७ आजी-आजोबांना घेऊन शनिवारी सकाळी सहलीच्या ठिकाणी गेलो. इयत्ता दुसरी व नववीच्या काही विद्यार्थ्यांनाही घेऊन गेलो होतो; पण सहलीसाठी नव्हे तर आजी-आजोबांच्या मदतीसाठी, असे पटेल म्हणाल्या. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर जणू मोकळं आकाश मिळाल्याचं समाधान दिसत होतं. कुणी तलावात डुंबण्याचा आनंदत घेत होते तर कुणी झोक्यावर मनसोक्त झुलत होते. एवढंच काय पण काही आजोबांनी रेनडान्सही केला. लहान मुलांप्रमाणे सर्वकाही विसरून ते आजी-आजोबा आनंद लुटत होते. शिक्षक, विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसह सहभोजनाचा आनंद लुटला. कृषी पर्यटन केंद्राचे आनंदराव शिंदे यांनी आजी-आजोबांसाठी विनाशुल्क सेवा दिली, अशी माहिती पटेल यांनी दिली. या निसर्ग सहलीत शाळेच्या प्राचार्या नवनीता पटेल, शिक्षिका जयश्री घाटगे, मीनाक्षी सापते, आयेशा मुजावर, नीता अवसरे आणि काही विद्यार्थीही सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर व जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांचे सहकार्य लाभल्याचे शिक्षकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चिमुकल्यांच्या पैशातून आजी-आजोबांना सहल!
By admin | Published: February 14, 2016 12:37 AM