सातारा : हक्काचं घर आणि माणसांनी स्वत:च्याच घरातून बाहेर काढलेल्या आजीबार्इंना यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुटुंबीयांनी नाकारलेल्या आजीच्या पाठीशी राहून समाजात माणुसकी अद्यापही जिवंत असल्याची जाणीव करून दिली.याबाबत अधिक माहिती अशी, स्वत:च घरं, एक मुलगा आणि विवाहित चार मुली असतानाही भाटमरळी, ता. सातारा येथील ललिता प्रकाश मोरे या आजीवर पोलिसांसमोर हात पसरण्याची वेळ आल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले.
हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवी बोडके यांनी लोकमतशी संपर्क साधून आपण या आजीबार्इंच्या निवाऱ्याची सोय करणार असल्याचे सांगितले. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या आजीबाई वर्षभरापासून साताऱ्यातील एका मंदिरात वास्तव्य करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.