पुसेगाव : माण तालुक्यातील मलवडी येथील गणपत जगदाळे या ९८ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली. केवळ दहा दिवसांतच ठणठणीत बरे होऊन घरीही परतले. निढळ येथील श्री सेवागिरी कोरोना केअर सेंटरमधील डॉक्टरांना रेमडेसिविर इंजेक्शन न वापरताही बरे करण्यात यश आले.
याबाबत माहिती अशी की, घरात मुलाला कोरोना झाला होता. सर्वतोपरी काळजी घेऊनही दि. १७ रोजी वयोवृद्ध वडील गणपत जगदाळे यांना तोंडाची चव जाऊन धाप व श्वसनाचा त्रास होऊ लागला. एचआरसीटी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबावर संकट कोसळले. वयाच्या ९८ व्या वर्षी कोरोनाने संक्रमित झाल्याने घरचे सर्वच सदस्य चिंतेत बुडाले होते. ऑक्सिजन लेव्हल ८० तर एचआरसीटी स्कोअर १७ अशा परिस्थितीत त्यांच्या नातवाने जिल्हाभर चौकशी करूनही ऑक्सिजन बेड व रेमडेसिविर इंजेक्शन कुठंही मिळेना. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने कोरोनाचा धोका सर्वात जास्त वृद्ध व्यक्तींना असतो असे ऐकून असल्याने सुरुवातीला नातवाचाही थरकाप उडाला होता.
निढळ येथील श्री सेवागिरी कोरोना केअर सेंटरमध्ये अखेर ऑक्सिजन बेड मिळाला. तेथील डॉक्टरांच्या पथकाने इंजेक्शनचा आग्रह न धरता मानसिक व भावनिक आधार देत तातडीने उपचार सुरू केले.
त्यावेळी कोरोनाशी खरी झुंज सुरू झाली. सुरुवातीला दोन दिवस आजोबांना ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घेणे. सकस आहारावर जोर देणे हा पॅटर्न तंतोतंत पाळला. पौष्टिक शाकाहारी जेवणासोबतच सकाळ-संध्याकाळ फळे खाण्यावर अधिक भर दिल्याने आजोबांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास चांगलीच मदत झाली. आहारा सोबतच डॉक्टर्स आणि नर्स यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन, उपचाराला साथ तसेच आयुष्यभर शेतीत कष्ट करून शरीराबरोबरच मनानेही कणखर असल्याने प्रबळ इच्छाशक्तीच्या, सकारात्मकतेच्या जोरावर आणि डॉक्टरांच्या यशस्वी उपचारांमुळे ९८ वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली. ते गुरुवार, दि. २९ रोजी घरी सुखरुप गेले.
चौकट :
हवाय उपचारांवर विश्वास...
रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागते. कोरोनाला घाबरण्याचे काही कारण नाही. कोरोनाची भीती अनाठायी आहे. कोणतीही भीती न बाळगता सकारात्मक विचार करावा. आपण कोरोनाला नक्की हरवू शकतो. डॉक्टरांच्या उपचारावर विश्वास, रुग्णाची मानसिकता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोरोनावर मात सहज होऊ शकते.