आदर्की : फलटण तालुक्यातील मुळीकवाडीचे माजी सरपंच तानाजी औटे यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून गावातील तीस कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य वाटप करून, सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
मुळीकवाडी (ता. फलटण) गावात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी मुळीकवाडी गाव बफर झोन जाहीर करून, गावातील लोकांनी त्याला प्रतिसाद देत, गावातील सर्व आस्थापना बंद ठेवल्या आहेत.
याच दरम्यान माजी सरपंच तानाजी औटे यांचा नातू संस्कार कदम याचा वाढदिवस असल्याने, त्याचा कौटुंबिक विचार सुरू असताना, तानाजी औटे यांनी वाढदिवसावर होणारा खर्च टाळून कोरोना काळात लोकांना मदत करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. त्याला घरातून मान्यता मिळताच, तेल, साखर, तांदूळ, तुरडाळ, बिस्किटे आदी. साहित्य खरेदी करून गावातील गरजू तीस कुटुंबांना वाटप करून कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपल्याने औटे कुटुंबाचे उपसरपंच गणेश कदम, पोलीस पाटील, ग्रामस्थांकडून कौतक होत आहे.