मलकापूर : कऱ्हाड - ढेबेवाडी रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, दुभाजकातील झाडे वाळली आहेत. पावसामुळे गवतही वाढले आहे. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.
रस्त्याची दुरवस्था
रामापूर : पाटण, त्रिपुडी ते चोपडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाटण त्रिपुडी ते चोपडी मार्गावर मोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
श्वानांची दहशत
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली हद्दीतील सिंदल ओढा ते बनवडी फाटा यादरम्यान भटक्या श्वानांचा वावर वाढल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हाड - मसूर रस्त्यावरून भटके श्वान फिरत असतात. अचानक वाहनांच्या समोर श्वान आल्याने अपघात होत आहेत.
अस्ताव्यस्त पार्किंग
कऱ्हाड : विद्यानगर येथे कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर दोन्ही बाजूला दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यानगरला रस्त्यानजीक अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये अनेकजण खरेदीसाठी येतात. मात्र, त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.