- लक्ष्मण गोरे, (बामणोली, जि.सातारा)
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पसरल्या आहेत. यात जावळी तालुक्याचाही समावेश आहे. त्यामुळे येथील पिकांना जंगली प्राण्यांचा मोठा उपद्र्रव होतो. या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी टणटण वाजणारी काचेची बाटली शोधून काढत यावर उपाय शोधला आहे. या साध्या उपकरणामुळे प्राणी पिकांकडे फिरकतही नाहीत.
जावळी तालुक्यात भात व नाचणीची पिके घेतली जातात; परंतु या पिकांना जंगली ससे, रानडुकर, रानगवे, मोर, साळिंदर या जंगली प्राण्यांचा मोठा धोका असतो. यापासून बचाव करण्यासाठी बामणोली, तापोळा परिसरातील शेतकऱ्यांनी बाटलीचा उपाय शोधला आहे. रिकामी एक लिटरची काचेची बाटली घेण्यात येते. एक मीटर नायलॉन किंवा तंगुसाच्या दोरीने बाटलीच्या गळ्याला बांधण्यात येते. त्यानंतर बाटली झाडाला बांधून उंचावर लटकविली जाते. त्यावेळी दोरीचे दुसरे टोक बाटलीतून खाली सोडण्यात येते. त्याला लोखंडी खिळा बांधलेला असतो. तसेच त्याच दोरीच्या खालच्या शेवटच्या टोकाला घरातील खराब झालेली कचरा काढण्याची सुपली किंवा प्लास्टिकची पिशवी बांधण्यात येते. हवेने सुपली हलते व खिळा बाटलीवर आपटून टण.. टण.. असा आवाज होतो.
कोणताही खर्च न करता रिकामी काचेची बाटली, खिळे, दोरी, सुपली, पिशवी या सर्व टाकाऊ वस्तूंपासून शेतकऱ्यांनी ही उपाययोजना केली आहे. तसेच हे उपकरण रात्रं-दिवस, बारा महिने चालू शकते. याच्यावर वादळ, ऊन, वारा, पाऊस याचा कोणताही परिणाम होत नाही. हवेची थोडीशी जरी झुळूक आली तरी काचेच्या बाटलीवर खिळा आपटून टण.. टण.. असा आवाज होतो. हा आवाज एक किलोमीटरपर्यंत जातो. यामुळे जंगली जनावरे याकडे फिरकत नाहीत. परिणामी पिकांचे नुकसान टळते.