- संतोष धुमाळ (पिंपोडे बु. जि. सातारा)
अहोरात्र काबाडकष्ट करून फुलविलेल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्याकडून होणारे नुकसान टाळणे महत्त्वाचे असते. हे ओळखूनच सातारा जिल्ह्यातील सोनके (ता. कोरेगाव) येथील फत्तेसिंग धुमाळ या शेतकऱ्याने नैसर्गिक पंखा तयार केला आहे. वाऱ्यावर फिरणाऱ्या या पंख्याच्या आवाजामुळे वन्य प्राण्याकडून होणारा उपद्रव थांबला आहे.
सोनके या गावातील प्रयोगशील शेतकरी फत्तेसिंग धुमाळ यांनी आपल्या कोरडवाहू शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. दुष्काळावर मात करीत त्यांनी आपल्या शेतीत ऊस, घेवडा व वाटाणा अशी कसदार पिके घेत फळबागही विकसित केली आहे. परंतु नैसर्गिक संकटांचा सामना करतानाच पाण्याआभावी डोंगराळ भागातील रानडुकरे, साळिंदर तसेच कोल्हे असे वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधात शिवारात फिरतात. मोर, बगळे, साळुंखी हे पक्षी पिकांचे नुकसान करतात.
हे लक्षात आल्याने त्यांनी कल्पक बुद्धी वापरून आधुनिक पद्धतीचा पंखा बनविला आहे. ज्यामुळे ऊस पिकाचे नुकसान करीत असलेली रानडुकरे तसेच वाटाणा, घेवडा, भुईमूग या पिकांचे नुकसान करणारे पक्षी घाबरत आहेत. हा पंखा वाऱ्याच्या वेगाने फिरल्यानंतर त्यावर बसविलेल्या तबकडीवर जोडलेल्या एका काठीद्वारे आवाजाची निर्मिती होते. त्यामुळे येणारे प्राणी व पक्षी घाबरतात. परिणामी पिकांची हानी टळून पयार्याने पिकांचे संरक्षण होते.
या उपकरणासाठी त्यांना किरकोळ खर्च आला आहे. एका नादुरुस्त पंख्याच्या पात्याला बेअरिंगच्या साह्याने लोखंडी रॉड बसविला आहे. या रॉडच्या मागील बाजूस वेल्डिंगच्या साह्याने आणखी एक रॉड बसवून त्याच्या दोन्ही बाजूस साधारणत: दोन साखळ्या जोडल्या आहेत. त्याच्या खालच्या बाजूला एक तबकडी जोडली असून, वाऱ्याच्या साह्याने पात्यासह लोखंडी रॉड फिरल्यानंतर त्यावरील साखळ्या तबकडीवर आदळून आवाज होतो. त्यामुळे प्राणी- पक्षी घाबरतात.