लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड या गावातील युवकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत ‘ग्रीन आर्मी महाबळेश्वर’ नावाने ग्रुप स्थापन केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून या युवकांनी एकत्र येत स्वखर्चातून मेटगुताड व अवकाळी गावांच्या वनक्षेत्रामध्ये जांभूळ, आवळा, करंज, आपटा, पिंपळ, काशीद, कडुलिंब, पोलारा, कडुलिंब आदी एक हजाराहून अधिक झाडांची लागवड केली आहे. दहा हजारांहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट या तरुणांचे आहे.
थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी देश-विदेशातून लाखो पर्यटक वर्षाकाठी भेट देत असतात. महाबळेश्वरची गुलाबी हवा, थंड वातावरण व गिरिशिखरांवर वसलेल्या या निसर्गरम्य महाबळेश्वरची ओळख येथील निसर्ग असून, गेली काही वर्षांत महाबळेश्वरमध्ये बेसुमार जंगलतोड व वाढत्या प्रदूषणामुळे परिस्थिती बदलत चालली असून, तापमानवाढ हा चिंतेचाच विषय बनला आहे. तापमानवाढ, जंगलतोड यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा स्थितीत तालुक्यातील मेटगुताड येथील काही युवकांनी एकत्र येत ‘ग्रीन आर्मी महाबळेश्वर’ या नावाने एक ग्रुपची निर्मिती केली आहे.
या मॉन्सूनमध्ये महाबळेश्वर तालुक्यात दहा हजारांहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट या ग्रुपच्या युवकांनी ठेवले आहे. दर शनिवार व रविवार या सुटीच्या दिवसाचा सदुपयोग करताना वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचे स्तुत्य काम हे युवक करत आहेत. आतापर्यंत ग्रीन आर्मी महाबळेश्वर ग्रुपने स्वखर्चातून मेटगुताड व अवकाळी गावांच्या वनक्षेत्रामध्ये एक हजाराहून अधिक झाडांची लागवड केली आहे.
या युवकांच्या या कार्याची दखल घेऊन गावातील काही व्यक्तींसह मूळचे पुण्याचे मात्र सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले अनिल थोरात यांनी या युवकांच्या कार्याला मोलाची मदत केली असून, या युवकांनी महाबळेश्वरकरांना ‘झाडे वाचवा.. महाबळेश्वर वाचवा..’ या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.