मल्हारपेठ : तालुक्यात नवीन ऊस प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यात आनंदी वातावरण आहे. सहकारातील प्रस्थापितांना खासगीकरणाच्या लाटेत नवीन प्रकल्पांना तोंड देताना दमछाक होऊन फटका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. जादा ऊस क्षेत्र असल्यामुळे हिरव्या पट्ट्यावर खासगीकरणाची मदार असून याचा फायदा तालुक्यातील ऊस उत्पादकांना होऊन बळीराजाला चांगले दिवस येतील, अशी चर्चा तालुक्यातील शेतकरी वर्गात सुरू आहे.पाटण तालुक्यातील कोयना नदी तीरावरील विहे ते येराडपर्यंतचा भाग हा हिरवा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात ऊस उत्पादन घेणारे अनेक लहान-मोठे शेतकरी आहेत. तालुक्यात एकच साखर कारखाना असल्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून ऊस उत्पादक जादा दरासाठी पर्यायी तालुक्याच्या बाहेर ऊस घालत होते. तालुक्यात लहान-मोठे सिंचन प्रकल्प झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र तालुक्यातील कारखान्याकडून इतर कारखान्याच्या तुलनेत कमी प्रमाणात दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता. त्यामुळे अगदी वाळवा तालुक्यातील कारखान्यालाही मोठ्या प्रमाणात ऊस जात होता. गत पंचवार्षिक निवडणुकीत तर ऊस तोडणीवरून मोठे राजकारण झाले. नुकतीच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी तालुक्यातील नवीन तीन ठिकाणी पाटण शुगर केन प्रकल्प काढण्याची घोषणा केल्यामुळे तालुक्यातील राजकारण तापले. याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत आमदार शंभूराज देसाई यांनी हा प्रकल्प खासगी असून ऊस उत्पादक सभासदांना त्याचा काय फायदा आहे, असा सवाल केला आहे. तर नुकतीच दोन दिवसांपूर्वी विहे गावाच्या हद्दीत नवीन १०० कोटींचा गगनगिरी अॅग्रो केन इंडस्ट्रीज प्रकल्पाची उद्योजक चंद्रकांत कदम यांनी घोषणा केल्यामुळे वातावरण आणखीनच तापले आहे.पाटण तालुक्यात ऊसप्रक्रिया करणारे नवीन चार खासगी प्रकल्प व एक सहकारी कारखाना होणार असल्यामुळे त्यांच्यातील स्पर्धेमुळे ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील, अशी चर्चा सुरू आहे. उसाची साखर होवो किंवा गुळाची पावडर होवो किंवा कोणीही कोणताही प्रकल्प सुरू करो आपल्याला फक्त जादा दर मिळणे गरजेचे आहे. आजपर्यंत राजकारण करून आपण आपला तोटा केला आहे. आता जादा दर देणार व लकवर ऊस नेणार त्यांच्याकडे ऊस घालायचा, अशी चर्चा आहे. (वार्ताहर)सहकारी कारखान्यांच्या व्यवस्थापकांना फटकानवीन खासगी प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर सहकारातील प्रस्थापितांना खासगीकरणाच्या लाटेत सहकार चालविणे अवघड जाणार आहे. खासगी प्रकल्पाची घोषणा केली तरी नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत आमदार देसाई यांनी डिस्टलरी किंवा को-जनरेशन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. तालुक्यात नवीन प्रकल्प आल्यामुळे अनेक कुटुंबातील तरूणांना नोकऱ्या लागणार आहेत. नवीन प्रकल्पांच्या स्पर्धेत ऊस उत्पादकांचा फायदा तर नक्कीच होणार; मात्र सहकार तत्वावरील कारखाना व्यवस्थापकांना मोठा फटका बसणार आहे.
हिरव्या पट्ट्यावर खासगीकरणाची मदार
By admin | Published: September 29, 2015 9:59 PM