रशिद शेखऔंध : एकरकमी एफआरपीसह आदी. मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरात ऊसतोड बंद आंदोलन केले. खटाव तालुक्यातही या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. आंदोलन तीव्र होण्यास सुरुवात होताच आज, सोमवारी चर्चेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ग्रीन पॉवर शुगर्सचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमूख यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीत ऊस दराची कोंडी फोडली. ग्रीन पॉवर शुगर्सने २८०१ रुपये दर सर्वानुमते जाहीर केला. यावेळी तालुक्यातील उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून पसंती दर्शविली.कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख, जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव, संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिहाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुका अध्यक्ष दत्तूकाका घार्गे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन पाऊले मागे घेण्याची आमची कायम तयारी आहे. गत हंगामातील शंभर रुपये व चालू हंगामात २८०१ दर देण्याचे जाहीर केले. आजपर्यंत शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखविला तो जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमूख म्हणाले की, ग्रीन पॉवर शुगर्सने आजपर्यंत वजनकाट्यात जो शेतकऱ्यांचा विश्वास कमावला आहे तो फार लाख मोलाचा आहे. अनेकदा आम्ही स्वतः खात्री केली आहे की ऊस बाहेरून वजन करून पुन्हा ग्रीन पॉवरच्या काट्यावर वजन केले असता एका किलोचा सुद्धा फरक आढळून आला नाही, त्यामुळेच ग्रीन पॉवरला ऊस कधी कमी पडत नाही.दरम्यान जेष्ठ शेतकऱ्यांनी संग्रामसिंह देशमूख यांचा सर्वात अगोदर दर जाहीर केल्याबद्दल सत्कार केला. यावेळी स्वागत सूर्यभान जाधव यांनी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे यांनी केले. तर आभार प्रमोद देवकर यांनी मानले. यावेळी खटाव तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साताऱ्यातील खटावमध्ये 'ग्रीन पॉवर शुगर्स'ने फोडली ऊस दराची कोंडी!, जाहीर केला 'इतका' दर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 3:42 PM