कोरेगाव : कोरेगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, विविध योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. दरम्यान, शहरातील विविध विकासकामांना त्यांनी तत्वत: मंजुरी दिली असून, त्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
कोरेगाव शहरातील विकासकामांच्या अनुषंगाने विधान भवनातील डॉ. पाटील यांच्या दालनामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. शशिकांत शिंंदे, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, मुख्याधिकारी श्याम गोसावी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. शहरातील तीन्ही मागासवर्गीय वस्त्यांसाठी विशेष नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून तरतूद करण्यास यावेळी तत्वत: मान्यता देण्यात आली. शहरासाठी आवश्यक असलेल्या अग्निशामक दलाच्या उभारणीस मंजुरी देण्यात आली. शहरातील शासकीय जागा नगरपंचायतीकडे वर्ग करणे, नगरपंचायतीस सुधारीत आकृतीबंध मंजूर करणे व कर्मचाºयांचा समावेश करणे, पंतप्रधान आवास योजना लागू करणे आणि शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये अद्ययावत करण्यासाठी अनुदानातून निधी उपलब्ध करुन देण्यास डॉ. पाटील यांनी संमती दर्शवली. याबाबत मुख्याधिकारी व नगरविकास विभागाच्या अधिकाºयांनी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे व मुख्याधिकारी गोसावी यांनी प्रत्येक मुद्यांवर सविस्तर माहिती दिली. मंत्री डॉ. पाटील यांनी या कामांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन त्यातील प्रस्तावांना मंजुरी देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी नगरविकास कृती समितीचे संघटक राजेश बर्गे, नगरसेवक नागेश कांबळे, गणेश येवले, दीपक फडतरे, महादेव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या विषयांवर चर्चाया बैठकीत विस्तारीत पाणी पुरवठा योजना (४० कोटी), घनकचरा प्रक्रिया प्रकल्प (५ कोटी), नगरपंचायत कार्यालय इमारत विस्तारीकरण (५० लाख), तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील मोकळी जागा विकसीत करणे (७ कोटी), प्रांताधिकारी कार्यालय जागा विकसीत करुन तेथे शॉपिंग सेंटरची उभारणी करणे (२ कोटी), जुना मोटार स्टँड-आझाद चौक भाजी मंडई विकसीत करणे (२ कोटी), शहरात उद्याने विकसीत करणे (१ कोटी), नाट्यगृह बांधणे (१० कोटी), स्मशानभूमी अद्ययावतीकरण (१ कोटी), श्री केदारेश्वर मंदिर परिसर विकसीत करणे (१० कोटी), भुयारी गटर योजना राबविणे (४० कोटी), सोलर व एलईडी पथदिवे बसविणे (१५ कोटी) अशा एकूण १३३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.