खडाळा : खंडाळा साखर कारखान्याची अल्पावधीत उभारणी करून खंडाळावाशियांचे धवल क्रांतीचे स्वप्न साकारलेल्या किसन वीर उद्योग समुहाने आता या कारखान्याचे उजाड माळरान मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून हरीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत बुधवारी (दि. १६) रोजी सकाळी नऊ वाजता खंडाळा साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करून हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
किसन वीर उद्योग समुहाचे प्रमुख मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने पांढºया शुभ्र साखरेला पुरक उद्योग व विविध उपक्रमांची जोड देत वृक्षलागवडीतून किसन वीर कारखान्याच्या खडकाळ माळरानाचे नंदनवन केलेले आहे. वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षणाची ही चळवळ व्यवस्थापनाने कारखाना कार्यक्षेत्रातील हजारो शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहोचविली आहे. किसन वीर कारखान्याची ही पर्यावरण संवर्धनाची परंपरा खंडाळा कारखान्यावर जोपासण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून खंडाळा कारखान्याचा उजाड माळ वृक्षराजीने हरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमास खंडाळा कारखान्यासह किसन वीर आणि प्रतापगडचे सभासद शेतकरी, विशेषत: खंडाळा तालुक्यातील सभासद शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन किसन वीर उद्योग समुहाचे प्रमुख मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.