कऱ्हाड : देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील दत्त चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष रोहित पंडित, खजिनदार विशाल डोंगरे, उपाध्यक्ष अक्षय खाडे, सागर साळुंखे, कृष्णत तुपे, सुजीत लादे, करण कोळी, सुनील वाडेकर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव उपस्थित होते.
वानरांचा उपद्रव वाढला
तांबवे : किरपे परिसरात वानरांचा उपद्रव वाढला आहे. शिवारातील पिकांवर ते डल्ला मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील काही शेतकऱ्यांवर वानरांनी हल्ला करण्याचेही प्रकार घडले होते. वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग
कोपर्डे हवेली : सध्या दीपावलीच्या सणास सुरुवात झाल्याने विद्यानगरमधून जात असलेल्या कऱ्हाड ते मसुर रस्त्यावर लोकांची गर्दी वाढली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यानगरला रस्त्यानजीक अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये अनेक जण खरेदीसाठी येतात. मात्र, त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
काले ते मसूर बस वेळेत सोडण्याची मागणी
कऱ्हाड : काले ते मसूर बस वेळेत येत नसल्यामुळे ग्रामस्थांना बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे. सकाळी पावणेसात वाजता सुटणारी काले-मसूर बस सध्या आठ वाजता गावात येते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कऱ्हाडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कऱ्हाड आगाराने ही बस साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांतून केली जात आहे.
फ्युज बॉक्सची दुर्दशा
उंब्रज : तासवडे ते कऱ्हाड मार्गावर रस्त्याकडेला अनेक ठिकाणी असलेले फ्यूज बॉक्स उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: जमिनीला टेकले आहेत. तर काही ठिकाणी फ्युजही गायब झाले असून, तारांवर खेळ सुरू आहे. वीज वितरणने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
श्वानांचा उपद्रव
कुसूर : कोळे, ता. कऱ्हाड परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कऱ्हाड शहरात हातगाडे वाढले
कऱ्हाड : येथील बाजारपेठ मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरस्त्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विक्रेते आपले हातगाडे घेऊन बाजारपेठेतील रस्त्यावर घुसत आहेत. अनेक जण रस्त्यातच हातगाडा उभा करून व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त हातगाडे उभे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.