कऱ्हाड : अंतवडी, ता. कऱ्हाड येथील महादेव निकम कारगिल युद्धामध्ये शहीद झाले होते. कारगिल विजय दिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीस्तंभास जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास व ग्रामस्थांनी अभिवादन केले. यावेळी माजी सैनिक संजय शेवाळे, माजी सैनिक सदाशिव नागणे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे तसेच अंतवडी येथील आजी-माजी सैनिक ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी शहीद जवान महादेव निकम यांचे वडील यशवंत दादू निकम यांचा सैनिक फेडरेशनच्यावतीने तसेच जिल्हा सैनिक आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पूरस्थितीची पाटबंधारे विभागाकडून पाहणी
कऱ्हाड : शहर व नदीकाठच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठावरील काही भाग पाण्याखाली गेला होता. या पूर परिस्थितीची पाहणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. कृष्णा कालवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी एस. एस. रणदिवे, शाखाधिकारी एस. एच. चव्हाण, जल आयोगाचे शाखा अभियंता अजित माने, एस. ए. सावंत, बी. एच. महाडिक उपस्थित होते. कृष्णा पुलाजवळ किती पाणी उतरले आहे, गतवर्षीच्या तुलनेत पाणीपातळीत किती वाढ झाली आहे, याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाकडून घेण्यात आली. तसेच नोंदी घेण्यात आल्या. पाण्यातील चढ-उताराचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
दीड महिन्यानंतर बाजारपेठ सुरू
कऱ्हाड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गत दीड महिन्यांपासून बंद असणारी कऱ्हाडची बाजारपेठ सोमवारपासून सुरू झाली आहे. सकाळी नऊ ते चार अशी वेळ असली तरी दुकाने उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. कऱ्हाड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. दैनंदिन बाधितांची संख्या साडेतीनशेच्या घरात गेली होती. त्यामुळे धोका अधिकच वाढला होता. चार दिवसांपासून हा आकडा दोनशेपर्यंत खाली आला आहे. शिवाय जिल्हा रेड झोनमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्बंध शिथिल करून बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.