म्हसवड : कुकुडवाड, ता. माण येथील ‘केटीएम’ ग्रुप गणेश मंडळाने सियाचीन येथे कर्तव्य बजावताना शहीद झालेले सुनील सूर्यवंशी यांच्या त्या घटनेवर अधारीत देखावा सादर करून वीर जवान सुनील सूर्यवंशी यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सामाजिक बांधिलकीच्या पलीकडे जाऊन एक विधायक व इतर मंडळांना प्रेरणादायी ठरेल असा देखावा सादर केला आहे. या मंडळाने सियाचिन येथे शहीद झालेले जवान सुनील सूर्यवंशी व इतर दहा जवानांचा जिवंत देखावा साकारला आहे. ना डॉल्बी, ना स्पिकर लावता अनावश्यक खर्चाला फाटा देत ध्वनीप्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.मंडळाने या गणेशोत्सवात नऊ महिन्यांपूर्वी सियाचीन या बर्फाळ प्रदेशात देशाच्या सीमेवर सीमेचे रक्षण करत असलेल्या तुकडीला निसर्गानेच आपल्या कवेत घेतले. त्यामुळे तमाम भारतीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या दहा जवानांचे शव शोधण्यास सतत अडथळे येत होते अखेर बाराव्या दिवशी शहीद जवान सूर्यवंशी यांचे शव मिळाले. महाराष्ट्रातील तमाम भारतीयांनी कुकुडवाड येथे येऊन शहीद जवानांचे शेवटचे दर्शन घेतले होते. (प्रतिनिधी)असे केले नियोजन...!या देखाव्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करून शहीद जवान सुनील यांचा पुतळा तयार करण्यात आला. इतर जवानांचे फोटो लावण्यात आले असून, देखावा बर्फाळ प्रदेशाचा अभास होईल, असा दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. या देखाव्यासमोर डॉल्बी स्पिकरचा कसलाच गोंगाट किंवा आवाज नाही. गणेश विसर्जन साध्या पद्धतीने करून शहीद जवान सुनील सूर्यवंशी व इतर जवानांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली म्हणून ग्रुपने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून, यात मिळालेली रक्कम सूर्यवंशी कुटुंबीयांना देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
गावच्या सुपुत्राला देखाव्याद्वारे अभिवादन
By admin | Published: September 13, 2016 12:31 AM