सातारा : कितीही दु:ख झालं तरी ते दु:ख कवटाळत न बसता आयुष्याचा गाढा पुढे न्यावाच लागतो; पण त्याला समाजाची साथ असेल तर हे दु:ख आणखीनच हलंक होतं. सध्या पूरग्रस्तांना मिळत असलेल्या मदतीतही हेच पाहायला मिळतेय. सर्वच स्तरातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. हे पाहून माणुसकी जपली अन् दु:ख हरल्याची प्रचिती येते आहे.
सातारा जिल्ह्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यातही पूरग्रस्तांसाठी माणुसकी धावून आली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्येही भूस्खलनामुळे शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले. या शेतकऱ्यांच्या मदतीला पुण्यातील उद्योजक राजेश बाहिते हे धावून आले. त्यांनी अख्खा ट्रकभरून जवळपास साडेतीनशे जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना स्वत: वाटल्या. माझ्या परीने मी एक छोटीशी मदत केलीय, समाजानेही या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर दुसरीकडे सर्वच स्तरातून उत्तमरीत्या प्रतिसाद मिळतोय. सातारा तालुका रेशन दुकान संघटना, शंकर बर्गे, सुलतानवाडी (ता. कोरेगाव), संजय निकम, जयंत गरज, कोविड डिफेडर ग्रुप, सातारा, मच्छिंद्र गोरे, सातारा, हेमंत त्रिगुणे, श्रीकांत शेटे, सातारा, तहसील कार्यालयही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलं आहे. यात कंपनी आणि महाविद्यालयांचाही वाटा आहे. त्यामध्ये
पार्ले-जी कंपनी, शुभम-इन हॉटेल, क्रेडाई, सातारा, श्री स्वामी सेवा मेडिकल फाउंडेशन, एमएसडब्ल्यू महाविद्यालय, जकातवाडी, अण्णासाहेब कल्याणी माजी विद्यार्थी बॅच, जाणीव विकास संस्था, दिलीप देशमुख, मे. पालेकर फूड, विठ्ठल भोसले, कांचन शेटे, राजधानी हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असो. सातारा, कोडोली कृतज्ञता मंच व कोडोली ग्रामस्थ, बौद्ध विकास तरुण मंडळ लिंब, मार्सिया मेटर इंडिया, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, वसुंधरा पर्यावरण संस्था व सातारा व कोरेगाव येथील शासकीय गुदामातील व वाहतूकदारांचे हमाल कामगार यांचाही समावेश आहे. सर्वांनी जिल्हा पुरवठा कार्यालयात मदत जमा केली.
चाैकट : ‘हॅम’ही सरसावले
सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅम ही संस्था नैसर्गिक आपत्तीप्रसंगी हॅम रेडिओ या वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनास नेहमीच मदतकार्यासाठी तत्पर असते. बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे, वाळंजवाडी, नांदगणे येथील पूरग्रस्तांना तातडीची मदत हॅमने केली. तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात आल्या. हॅमच्या अध्यक्ष कोमल भोसले यांनी अद्यापही पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे.