कऱ्हाड : मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता, बँकेचा एकूण ठेव व्यवहार २,७८० कोटी तर कर्ज व्यवहार १,६७२ कोटी झाला आहे. एकूण व्यवसाय ४,४५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला ६७.७३ कोटींचा ढोबळ तर आयकर व तरतुदी वजा जाता २१.८९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कोरोनासारख्या अनिश्चिततेच्या वातावरणात सुरू झालेला या आर्थिक वर्षाचा प्रवास अंतिम चरणात उत्तम यश देऊन गेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, सन २०२०- २१ या आर्थिक वर्षाची सुरूवातच कोरोना विषाणू महामारीच्या साथीमध्ये आणि लॉकडाऊनमध्ये झाली. त्यातच रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिलासा देताना एकंदर सहा महिन्यांचा विश्रांती कालावधी देऊ केला आणि त्यामुळे कर्जाची मुदत सहा महिन्यांनी वाढली. तसेच बँकेने आवाहन करूनही कोणत्याही कर्जदाराने कर्ज पुनर्रचना योजनेचा फायदा न घेता, नियमितपणे कर्ज परतफेड केली, हे विशेष आहे.
बॅंकेने वसुलीच्या आघाडीवरही उत्तम कामगिरी करत जुन्या एन. पी. ए. खात्यांतून जवळपास ५० कोटींपेक्षा अधिकची रक्कम वसूल करण्यात यश मिळवले आहे. गतवर्षी निव्वळ एन. पी. ए.चे प्रमाण ७.६५ टक्के होते. त्यामध्ये २.७७ टक्क्यांनी घट नोंदवत हे प्रमाण ४.८८ टक्के इतके राहिले आहे. त्याचप्रमाणे एन. पी. ए. रक्कमेतही १६ कोटींची घट झाली आहे. खंडोबा प्रसन्न साखर कारखाना लि. यांच्याविरूद्ध बँकेने नादारी व दिवाळखोरी संहितेंतर्गत दाखल केलेला वसुलीचा दावा सुप्रीम कोर्टात यशस्वी झाला आहे. त्यामध्ये १७ कोटींहून अधिक रकमेची प्रत्यक्ष वसुली झाली आहे. अशाप्रकारे यशस्वी कारवाई करणारी ही पहिली सहकारी बँक आहे, अशी माहिती अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी दिली.
बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत होत आहे. चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.२४ टक्के राखून आपली सक्षमता आणि आर्थिक सुदृढता सिद्ध आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. संस्थात्मक ठेवी कमी राखण्याचे धोरण राबवूनही गतवर्षीपेक्षा २६ कोटींनी ठेव व्यवहारांत वाढ झाली आहे. चालू वर्षात बँकेने ‘कोव्हिड अनसिक्युअर्ड कर्ज योजना’ राबविल्याचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी म्हटले आहे.
बँकेच्या कर्जव्यवहारांचा आढावा घेतला असून, त्याच्या पूर्ततेसाठी एक पथदर्शी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या वेळेत या सर्व निकषांची पूर्तता बँक नियोजबद्धपणे करेल, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी दिली.