लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लॉकडाऊनच्या कालावधीत नक्की करायचं काय, असा प्रश्न अनेकांना सतावत असताना काहीजणांची मात्र आपल्या कल्पनाशक्तीतून काहीतरी भन्नाट करण्याची धडपड सुरू झाली आहे. खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्यानेदेखील लॉकडाऊनचा सदुपयोग केला आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून भुईमूग शेंगा तोडणी यंत्र बनवले असून, त्यांचा हा प्रयोग यशस्वीही झाला आहे.
दादासो झुंबर धायगुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. धायगुडे यांचा शेती हा पूर्वापार व्यवसाय आहे. शेतीत नवनवीन बदल होत असल्याने आपण यात मागे का, असं धायगुडे यांना नेहमीच वाटत होतं. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा शेतकऱ्यांनादेखील फटका बसला आहे. मजूरच मिळत नसल्याने शिवारातील कामे खोळंबली आहेत. या समस्येवर कसा तोडगा काढावा, या विवंचनेत असताना दादासो धायगुडे यांना भुईमूग शेंगा तोडणारे यंत्र बनविण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी तातडीने हे यंत्र बनविण्याचं काम हाती घेतलं.
लाकडी फळ्या, बेअरिंग, बैलगाडीच्या चाकाच्या रिंगा, लोखंडी पट्ट्या, नट बोल्ट, खिळे, लोखंडी पार असे टाकाऊ साहित्य त्यांनी एकत्र केले. आपल्या कल्पनाशक्तीने या साहित्याची जोडणी करून त्यांनी भुईमूग शेंगा तोडणी यंत्र प्रत्यक्षात तयार केले. सर्व साहित्य जोडण्यासाठी त्यांना एकूण चार हजार रुपये खर्च आला. धायगुडे यांनी संकटापुढे हात न टेकता, त्यावर कशी मात करता येते, याचा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.
(चौकट)
मशीनचे असे आहेत फायदे
- हे मशीन ट्रॅक्टरला जोडावे लागते.
- ट्रॅक्टरद्वारे मशीन फिरते व त्याद्वारे भुईमूग शेंगा तोडल्या जातात.
- एक मशीन चार मजुरांची उणीव भरून काढते.
- कमी कालावधीत अधिक काम व वेळेची बचत होते.
(कोट)
कोरोना महामारीमुळे सध्या मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. मजुरांची उणीव कशी भरून काढायची, या विचारात असताना हे मशीन बनविण्याची संकल्पना डोक्यात आली. काहीतरी वेगळं करून आपले आणि आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट कसे हलके करता येतील, यासाठी भुईमूग शेंगा तोडण्याचे मशीन बनवलं.
- दादासो धायगुडे, शेतकरी
फोटो : २७ अंदोरी फोटो
खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथील शेतकरी दादासो धायगुडे यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून भुईमूग शेंगा तोडणी यंत्र तयार केले आहे.
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी