प्रमोद सुकरे
कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आपली उमेदवारी निश्चित व्हावी यासाठी इच्छुक नेत्यांकडे फिल्डिंग लावत आहेत. पण ज्या इच्छुकांना उमेदवारीचा कौल मिळालेला नाही त्यातील काही विरोधकांच्या गोटात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. त्यासाठी २५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, एक जूनपर्यंत त्याला मुदत आहे. त्यामुळे सध्या इच्छुकांची मोठी गडबड सुरू दिसत आहे.
सातारा, सांगली जिल्ह्यांतील काही तालुक्यांत कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. कार्यक्षेत्रातील १२८ गावांमधील ४७ हजारांवर कारखान्याचे उत्पादक सभासद आहेत. निवडणुकीसाठी त्यांचे सहा गटांच्या माध्यमातून मतदान होणार आहे. सध्या कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलची सत्ता आहे. ते पुन्हा तयारीनिशी रिंगणात उतरत आहेत, तर त्यांच्या विरोधात माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे. सत्ताधारी भोसले यांना शह देण्यासाठी विरोधी दोन माजी अध्यक्ष मोहित्यांच्या मनोमिलनासाठी वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्नही सुरू आहेत.
या तीनही पॅनेलकडे इच्छुक उमेदवारांची संख्या बरीच आहे. या सर्वांचे समाधान करणं नेत्यांसाठी खूप अवघड होऊन बसले आहे. त्याचाच परिणाम पाहायला मिळत आहे. माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांचे कट्टर समर्थक मिलिंद पाटणकर हे इतर मागास प्रवर्गातून सहकार पॅनेलमधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सोमवारी अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वडगाव दुशेरे गटातूनही सहकार पॅनेलची उमेदवारी मागणाऱ्या माजी संचालक बाळासाहेब जगताप यांनीही आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नेर्ले तांबवे गटातून बेलवडे येथील डॉ. इंद्रजित मोहिते यांचे कट्टर समर्थक असलेल्या मारुती मोहिते यांनी अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलमधून अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी मिळत नसल्याने विरोधकांच्या गोटात सहभागी होणाऱ्या इच्छुकांच्या पोटात नेमकं काय दुखतंय याचा अंदाज मात्र नेत्यांना लागताना दिसत नाही.
चौकट
काँग्रेस समर्थकही भरणार अर्ज ...
डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील आग्रही आहेत. पण मनोमिलनाच्या चर्चेला अजूनही मूर्तस्वरूप प्राप्त झालेले नाही. तरीही काँग्रेस कार्यकर्ते त्याबाबत आशावादी आहेत. म्हणूनच मंगळवारी कराड तालुक्यातील काँग्रेसचे काही इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज तरी भरून ठेवा, काय करायचं ते नंतर बघू, असा सल्ला त्यांना नेत्यांनी दिल्याचे खात्रीशीर समजते.
चौकट
मंगळवारच्या घडामोडींवर लक्ष...
मंगळवारी (दि. १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी संख्या असणार यात शंका नाही. पण कोण इच्छुक कोणत्या पॅनेलमधून अर्ज भरतोय? कोणी नाराज विरोधकांच्या हाताला लागत नाही ना? या घडामोडींवर साऱ्याच नेत्यांचे लक्ष राहणार आहे.