सातारा : अलीकडे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये डोळ्यासमोर कितीही माणसे उभी राहिली तरीही कर्मचाऱ्यांचे मोबाइलशी चाळे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवल्याचे ऐकिवात आहे. शासनाचे बदललेले आणि नवीन आलेल्या परिपत्रकाची माहिती देणे, कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून काही सूचना आणि घ्यावयाची काळजी, यासाठी जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांनी स्वत:चे व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केले आहेत. शासकीय कार्यालयात कामाच्या नियोजनासाठी रोजच्या रोज बैठका घेणं अशक्य बाब आहे. अशावेळी कामाचे नियोजन त्यात केलेले बदल आणि कार्यवाही करण्याची पद्धत या सर्व गोष्टी एकाचवेळी सर्वांना समजाव्यात म्हणून अनेक शासकीय कार्यालयांमध्ये असे काही व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय आहेत. या ग्रुपचे अॅडमिन बहुतांशदा संबंधित कार्यालय प्रमुख असतात. त्यांच्या सोयीसाठी आणि कामातील सुसूत्रता आणण्यासाठी या ग्रुपचा उपयोग होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हातातील काम सोडून या ग्रुपवर कायम राहावे किंवा खूप हातघाईचे निरोप असल्याने कायम आॅनलाइन राहावे, हे अपेक्षित नसते. पण, तरीही काही अधिकारी व कर्मचारी महत्त्वाचे काम सोडून मोबाइलमध्ये डोके घालून बसलेले दिसतात. हे प्रकार शक्यतो शासकीय आढावा बैठकींमध्ये दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)
निरोपांची देवाणघेवाण.. जिल्ह्याबाहेर राहणारे अनेकजण सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेच्या आधी साताऱ्यात पोहोचायचा प्रयत्न करतात; पण प्रवासात काही अडचण आली किंवा निघायला उशीर झाला, तर उशिरा येण्याचे निरोप ग्रुपवर टाकतात. यामुळे त्यांच्या टेबलचे काम दुसरे कोणीतरी करते किंवा येणाऱ्या नागरिकांना संबंधित उशिरा येणार असल्याविषयी माहिती देतात. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी परगावाहून येतात. असे कर्मचारी उशिरा येण्याचे निरोपही ग्रुपवर पाठवितात.अधिकारी बिल्डरांच्याही ग्रुपवर.. सातारा जिल्हा प्रशासनात असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना पत्रकारांच्या काही ग्रुपमध्ये अॅड करून घेतले आहे. बिल्डर आणि वैद्यकीय व्यावसायिकांनीही प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना ग्रुपवर घेतले आहे. त्यामुळे अधिकारीही अपडेट राहतात. चॅटींगची कटकट.. प्रशासनात उच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजचा वैताग आला आहे. कित्येकदा तेच ते मेसेज आणि त्याच-त्याच पोस्ट, यामुळे अधिकारी कंटाळतात. दिवसातून दोन-तीनवेळा काय आलेय, ते पाहून हेअधिकारी आॅफलाइन जातात. त्यांना ग्रुपवर चॅटिंग करणे, हे त्रासाचे आणि कटकटीचे वाटते. मैत्री टिकविण्यासाठी उपयुक्त ग्रुप प्रशासकीय अधिकारी म्हणून साताऱ्यात कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना मित्रांबरोबरचे ऋणानुबंध केवळ व्हॉट्सअॅपच्या निमित्ताने जोपासता येतात. त्यामुळे रोज ठरवून आपापल्या बॅचमेटच्या ग्रुपवर हे अधिकारी मनसोक्त गप्पा मारतात. दिवसभरातील कामाचा ताण विसरण्यासाठी आणि आपल्यातील मैत्री जोपासण्यासाठी दिवसातील एखादा तास यासाठी खर्ची घालविण्यासाठी हे अधिकारी तयार असतात.