सातारा : सध्या रामफळांचा हंगाम असल्याने महामार्गाच्या कडेला रामफळे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आली आहेत. विदेशी किंवा परराज्यांतून कितीही प्रकारची फळे आली, तरीही महाराष्ट्रातील फळांची सर कशालाच नाही. अत्यंत चवदार आणि गोड फळ म्हणून रामफळ सातारकरांना अधिक प्रिय आहे.
रसवंतीगृहे फुलली
सातारा : उन्हाच्या झळा तीव्र होतील, तसं रसवंतीगृहांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. उन्हापासून थोडासा गारवा मिळावा म्हणून ग्राहकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. उसाचा रस आरोग्याला फलदायी असल्याने ग्राहकवर्गातून या पेयाला चांगली मागणी आहे.
कर्मचा-यांना सेवेत घेण्याची मागणी
सातारा : शहरातील जम्बो कोविड सेंटरमधील सेवेतून कमी केलेल्या कर्मचा-यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी अश्विन बडेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. कोरोना उद्रेक काळात आरोग्य विभागात कर्मचा-यांची कमतरता जाणवल्याने त्वरित भरती प्रक्रिया राबवून कंत्राटी कर्मचा-यांना कामावर घेण्यात आले होते. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या या कर्मचा-यांना घ्यावे, अशी मागणी बडेकर यांनी केली आहे.
सेवारस्त्यांची दुरवस्था
सातारा : महामार्गाप्रमाणेच सेवारस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. विशेषत: आनेवाडी टोलनाका ते सातारा या दरम्यानच्या दोन्ही बाजूंचे सेवारस्ते जागोजागी उखडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. लिंब खिंड परिसरात तर सेवारस्त्यांची चाळण झाली आहे. या सेवारस्त्यावर उखडलेली खडी अपघाताला निमंत्रण देत आहे. दोन्ही बाजूंचे सेवारस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी या रस्त्यालगतच्या स्थानिक नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.
पालन करण्याच्या सूचना
सातारा : कोरोना रुग्णांची संख्या राज्यासह जिल्ह्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिका-यांनी मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगसह प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीवेळी भाविकांनी मंदिरात गर्दी न करता सूचनांचे पालन करत कोरोनाचा धोका कमी करणे आवश्यक आहे.