पेट्री : सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढविणारी येथील हिरवीगार दाट झाडी, तसेच कित्येक वर्षे पर्यटकांना सुखावह स्पर्श देत विविध प्रकारच्या आठवणी जोपासणारी येथील मोठमोठी वृक्षे. शहराच्या पश्चिमेकडील निसर्गसौंदर्य अबाधित ठेवणारी या मार्गावरील हजारोंच्या संख्येची वनसंपदा धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे.या वनांमध्ये नीलगिरी, जांभुळ, आंबा, फणस यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.
गत दोन वर्षांपासून गळ्यात मृत्यूचे ताईत टांगलेली हजारोंच्या संख्येने असलेल्या वनसंपदेच्या मुळावर विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव बसला जात असल्याने येथील घनदाट, दाट वृक्षाचे रुपांतर शुष्क वाळवंटात तर होणार नाही ना? अशी साशंकता पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमीतून व्यक्त होऊ लागली आहे.साताऱ्याच्या पश्चिमेकडे बोगदा ते कास येथील रस्त्याचे रुंदीकरणात बोगदा ते कास रस्त्यालगत तसेच कास तलावाच्या परिसरातील विविध प्रकारच्या मोठमोठ्या झाडांच्यावर गडांतर येऊन या झाडांवर गत दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात पिवळ्या रंगांच्या लोखंडी पट्ट्या मारून साडेतीन हजारांपर्यंत क्रमांक दिले होते. यामुळे विकासाचा घाव कधी झाडांच्या मुळावर पडेल याची शाश्वती नाही.
रस्त्याचे काम असो अथवा विजेचे खांब रोवून तार ओढण्याचे काम. अशा अनेकविध प्रकारची कोणतीही कामे करायची म्हटले की, प्रथम नजर वळते ती झाडांवर. झाडांचा कधीही अडथळा होत नाही तर झाडेच पर्यावरण असंतुलनातील अनेकविध अडथळे बाजूला करतात. मग आत्ता या झाडांचे आयुष्य संपुष्टात येणार असेल तर या बदलात नव्याने वृक्षारोपण करण्याची पर्यायी व्यवस्था संबंधित खाते काय करणार? अथवा काय केली आहे.विनाशाची टांगती तलवार...पर्यटनस्थळाचा विकास तसेच नागरिकांच्या मुबलक पाण्याचा प्रश्न सोडवला जात असताना येथील कित्येक वर्षापासूनच्या झाडांवर आत्ता विनाशाची टांगती तलवार पडली जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. पर्यावरण समतोल राखत असताना नियम असे सांगतो की, एक झाड नष्ट झाले तर त्याबदलात दहा झाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे.