प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसवर जीएसटी लागू झाल्यामुळे या मूर्तींच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर शाडूमाती जीएसटीमध्ये येत नसल्याने शाडूच्या गणपती मूर्तींचे दर गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त होणार आहेत. त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची संधी भक्तांना मिळणार असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.जीएसटीमुळे बाजारपेठेतील ब्रँडेड वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या तरीही दुसºया बाजूला स्थानिक वस्तूंवर हा कर नसल्यामुळे याचा फायदा शाडूच्या मूर्ती तयार करणाºया व्यावसायिकांना होत आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसची पोती, विविध प्रकारचे रंग, चकमक, अमेरिकन डायमंड, मोठ्या गणेश मूर्र्तींसाठी काथ्या, प्लॉस्टर आॅफ पॅरिस, असा सर्व कच्चामालावर जीएसटी कर असल्यामुळे या मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. कलाकारांची मजुरी तसेच दोन-तीन महिने न पडलेला पाऊस यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीतही वाढ झाली आहे.अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना आताच वेध लागले आहेत. यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांना गतवर्षीच्या तुलनेत जादा खर्च करावा लागणार आहे. कारण यावर्षी उत्सवासाठी लागणाºया प्लास्टर आॅफ पॅरिस गणेश मूर्तींच्या किमतीत सुमारे २५ ते ३० टक्के वाढ होणार आहे.मूर्ती बनविण्याचे काम कुंभारवाड्यांत सुरू आहे. मूर्तीसाठी प्राधान्याने शाडू, विविध प्रकारचे रंग, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, मोठ्या मूर्तींसाठी काथ्या, इतर साहित्य आदी कच्च्या मालाची सुमारे २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे पोतेगेल्यावर्षी ४०० रुपयांपर्यंत मिळत होते. यावर्षी ते सुमारे ६०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. वॉटर कलर, आॅईलपेंटच्या किमतीमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, मूर्ती आकर्षक दिसाव्यात यासाठी वापरण्यात येणारी चकमक सुमारे ३० टक्क्यांनी वाढली आहे. ही दरवाढ प्रामुख्याने जीएसटी आणि इंधन दरवाढीचा परिणाम असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.मूर्ती साच्यात ओतणे, फिनिशिंग यासाठी दिवसाला एका मजुराला सुमारे ३५० ते ५५० रुपये द्यावे लागतात. प्राथमिक रंग कामासाठी ४०० रुपये तर मूर्तीवरील कलाकुसर आणि डोळे रेखणाºया कलाकारांना १००० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. यामुळे यावर्षी आकर्षक रंगकाम आणि रेखीव अशा दोन फुटी उंचीच्या मूर्र्तींसाठी सुमारे १५०० ते २००० रुपये मोजावे लागणार आहेत.जीवनावश्यक वस्तूंसह गणेशमूर्तीच्या किमतीतही होणारी वाढ सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरणार आहे. हट्टाने शाडूची मूर्ती बसवणाºयांसाठी दरांमध्ये सुखद धक्का आहे.सार्वजनिक मंडळांना पीओपीला पर्याय नाहीसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मोठ्या आणि उंच मूर्ती बसविण्याकडे कल असतो. या मोठ्या मूर्ती तयार करण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिस उपयुक्त असते. शाडूच्या मातीपासून तयार होणारी मूर्ती उंच करता येत नाही. शाडू मूर्ती उंच करायचीच म्हटली तर ती दुभंगण्याची भीती असते. त्यामुळे कुंभारवाड्यात साच्यात टाकून कथ्थ्या लावून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्ती तयार करायला श्रमही कमी पडतात आणि चटकदार रंगछटांमुळे मूर्ती आकर्षक दिसतात. शाडूची मूर्ती तयार करायला आता कारागीरही मोजकेच असल्यामुळे त्यांचा मेहनतानाही जास्तीचा असतो. सार्वजनिक मंडळांना मोठ्या उंचीच्या मूर्ती लागत असल्यामुळे त्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या घेण्याकडेच त्यांचा कल असतो. शहरातील काही मंडळांनी कायमस्वरूपी फायबरच्या मूर्तीही तयार करून घेतल्या आहेत. पण या खर्चिक असल्याने छोट्या मंडळांना या मूर्ती तयार करणं परवडत नाही.
जीएसटी करामुळे शाडूच्या दरांमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे यंदा शाडूचे गणपती गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त होणार आहेत. पण प्लास्टर आॅफ पॅरिसवर जीएसटी असल्यामुळे त्या मूर्तींच्या दरांमध्ये यंदा २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होणं अपेक्षित आहे. या बरोबरच कच्चा मालही महागला आहे. याचा संयुक्तिक परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर दिसणार आहे.- पोपट कुंभार, व्यावसायिक, गडकर आळी, सातारा