सातारा : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्युंच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क झाले असून शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धावती भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत खडे बोलही सुनावले. तसेच कागदी घोडे नाचवू नका, औषधे कधी संपणार याची माहिती ठेवा, असे फर्मानही सोडले.राज्यातील नांदेडच्या रुग्णालयात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्य शासनावर चाैफेर टीका होत आहे. रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी आणि औषधसाठा शिल्लक रहावा, रुग्णांना बाहेरुन औषधे आणावयास लागू नये यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत काही निर्णय घेतले आहेत. त्यासाठी स्थानिकस्तरावर औषधे खरेदी करता येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेण्याचीही सूचना केली आहे. यामुळे सरकार अॅक्शन मोडवर आहे. असे असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सकाळी दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली.
पालकमंत्री देसाई यांच्याबरोबर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सुरुवातीला अतिदक्षता विभागाला भेट दिली. अतिदक्षता विभागातील बेडची क्षमता, रुग्णांवर वेळीच उपचार होतात का ? अडचणी काय आहेत का याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर औषध साठा ठेवलेल्या स्टोअरला भेट दिली. स्टोअर रुममध्ये गेल्या-गेल्या त्यांनी पाटण, कऱ्हाड, दहिवडी ग्रामीण रुग्णालयात किती औषधसाठा शिल्लक आहे, असा प्रश्न केला. याबाबतचे रजिस्टर तसेच प्रिंट द्या, अशी सूचनाही केली.खासगी स्टोअर किपरपेक्षा शासकीय रुग्णालयातील किपरला पाच पट जादा पगार आहे. त्यामुळे कामे चांगली करा, असेही सुनावले. तसेच जिल्हा नियोजनमधून औषधासाठी पैसे मिळतात. स्थानिक स्तरावर औषधे खरेदीचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे नियोजन करा, असेही फर्मानही सोडले. त्यानंतर पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी निघून गेले.