कराड: सातारा लोकसभेची निवडणूक ही कराड -पाटण तालुक्यावर बरीचशी अवलंबून आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते जेवढा जोर लावतील तेवढे मताधिक्य वाढेल असं सांगत विजयाचे श्रेयही त्यांनाच जाणार आहे असा चिमटा भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कराडच्या महायुतीच्या मेळाव्यात काढला.मात्र तुम्ही दोघे भाऊ- भाऊ आज शंभुरांच्या गळ्यात हे सगळं अडकवायचं असं ठरवून आला आहात काय ?अशी मिश्किल टिपण्णी मंत्री शंभूराजांनी शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्याकडे बघत केली. तर ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्यांनी सूक्ष्म नियोजन करायला हवे असा 'कानमंत्र' दिला. नाहीतर त्याच गाड्या अन तेच गडी नुसतं घेऊन फिरून चालणार नाही. अशा कानापिचक्या द्यायलाही ते विसरले नाहीत. आता त्याचीच चर्चा सगळीकडे सुरू आहे.
कराडच्या महायुतीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील नेत्यांची हजेरी पाहायला मिळाली. पालकमंत्री शंभूराज देसाई ,खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार आनंदराव पाटील, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पण यात अजित पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी भाषणात अजून उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी उदयनराजे भोसले यांच्या नावाची औपचारिकता बाकी आहे असे म्हणताच व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या खसखस पिकली.
नाचता येईना अंगण वाकडेदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे विरोधकांच्याकडे या निवडणुकीत मांडण्यासाठी ठोस मुद्दे नाहीत. म्हणून ते काहीही आरोप करीत आहेत. त्यांची अवस्था 'नाचता येईना अंगण वाकडे' अशी झाल्याचा टोला सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. शिवाय विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.
म्हणे भावाभावात तुम्ही वाटून घ्या .. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाषणात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना उद्देशून म्हटले की, पालकमंत्र्यांनी जोर लावला की महायुतिचा उमेदवार विजयी झाला म्हणून समजायचं आणि भविष्यात या मतदारसंघातून शंभूराज देसाई सुद्धा निवडणूक लढवू शकतात. त्यावर शंभूराज देसाईंनी हात जोडून तुम्ही भावा भावात ते वाटून घ्या असे म्हणताच एकच हशा पिकला.
अजित पवार राष्ट्रवादीची मेळाव्याकडे पाठकराडच्या या महायुतीच्या मेळाव्यात इतर सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली असंच दिसून आले. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, उमेदवार म्हणून चर्चेत असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कराडचे राजेश पाटील - वाठारकर,अँड.आनंदराव पाटील - उंडाळकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सादिक इनामदार, कराड तालुका अध्यक्ष जितेंद्र डुबल यांच्यासह कार्यकर्ते मेळाव्याकडे फिरकलेच नाहीत. मात्र व्यासपीठावरून बोलताना अनेक नेत्यांनी यातील अनेकांचा नामोल्लेख केला बरं ..
नरेंद्र पाटील म्हणाले मी आशावादीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, माथाडी नेते नरेंद्र पाटील या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. पण त्यांनी बोलताना मी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही इच्छुक आहे असं सांगितले.तर उदयनराजेंना उद्देशून तुम्ही दिल्लीला गेलात पण आमचं दिल्लीत कोणी नाही असा चिमटाही काढला.पण मुंबईत मात्र माझा सारखा संपर्क आहे. त्यामुळे मी आशावादी असल्याचे सांगितले. त्याचीही सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
पण पाणी पूजन एकट्यानेच केलं.. खरंतर तारळी धरणातील पाणी यावर्षी मनोज घोरपडेंनी कराड उत्तर मध्ये नेले. गेले १० वर्ष हे काम प्रलंबित होते. पण पाणी पूजन मात्र त्यांनी एकट्यांनेच केले.असा चिमटा शंभूराज देसाईंनी काढला. तसेच असू देत भावाभावात असं चालतं असे म्हणत त्याला पूर्ण विरामही दिला.