वडूज : खटाव तालुक्यात कोरोनाच्या महामारीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या चाचणी रामभरोसे, कोविड लसीकरणाचा फज्जा, कोविड सेंटरला बेड नाहीत, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता, वडूज येथील ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार याचबरोबरीने नागरिकांना महावितरण, जलसंपदा व महसूल विभागातील कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी खटाव तालुक्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी बाळासाहेब पोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या खटाव तालुक्यात भयावह परिस्थिती असताना तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार तब्बल एक महिना रजेवर असल्यामुळे नागरिकांना केवळ हेलपाटे मारून मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवजांचे रजिस्ट्रेशन आठ-आठ दिवस होत नाही. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. जलसंपदा विभागातील उरमोडी, तारळी प्रकल्प योजनेतील कॅनॉलला सोडण्यात येणारे पाणी अनियमित असल्याने पैसे भरणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अजूनही पाणी पोहोचत नाही. तर येरळवाडी गावच्या सातबाऱ्यावर पुनर्वसनाचे उरमोडी, तारळीचे शिक्के आहेत. याबाबत कुठलाही फेरफार नसताना मारण्यात आलेले हे बेकायदेशीर शिक्के ताबडतोब कमी करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. खटाव तालुक्याचे प्रमुख कारभारी गायब असल्याने तालुक्यातील प्रशासनामध्ये कोणताही समन्वय न राहिल्याने त्रस्त ग्रामस्थांना कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. या वास्तव स्थितीमुळे खटाव तालुक्यातील जनतेची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वडूज येथे तातडीने आढावा बैठक घेऊन तालुक्यातील जनतेची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी येरळवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पोळ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर माजी सरपंच सदाशिव बागल, विजय गोडसे, विनोद शिंदे, ईश्वर जाधव, आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.