खटाव : गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे नववर्षाचे स्वागत अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले. याही वर्षी चित्र काही वेगळे नाही. राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
गुढीपाडव्याच्या सणासाठीदेखील नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा गुढीपाडवा घरच्या घरी साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्रात हिंदू नववर्षाचे स्वागत गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकालाच असल्याचे दिसून आले.
गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी प्रत्येक घरात जय्यत तयारी केली जाते. पूजेसाठी लागणारी फुले, बाबूंची काठी तसेच इतर पूजा साहित्य आदी खरेदीसाठी घराबाहेर पडून विनाकारण गर्दी करून कोरोनाला निमंत्रण दिले जाऊ नये, यासाठी कडक नियमावलीचे पालन करण्याचे प्रयत्न करण्यात आले तर गुढीपाडव्याच्या सणावर कोरोनाचे सावट दाट असल्यामुळे हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्वच थरातून करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध साहित्याचा वापर करून यंदाचा गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात आला तर राज्यावर आलेले कोरोनाचे वाढते संकट लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली.