कोपर्डे हवेली : सध्या कोपर्डे हवेली परिसरात हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणावर ऊस, भुईमूग, भाजीपाला आदी पिकांवर प्रादुर्भाव झाला असल्याने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कृषी सहाय्यक मनिषा कुंभार, कृषी पर्यवेक्षक पंडित मोरे यांनी पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी अजय पाटील यांच्या शेतात जाऊन हुमणी पिकाचा कसा बंदोबस्त करावा, याविषयी मार्गदर्शन केले.
हुमणी अळीचा प्रादुर्भाव पाच ते सात महिन्यांचा असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हुमणीची अळी पिकांची पाने, खोड कुरतडून टोकते, त्यामुळे पिकांना अन्न, पाणी मिळत नसल्याने पाने पिवळी पडून कालांतराने पीक वाळून जाते. हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध उपाय त्यामध्ये बुरशी द्रावण एकरी २ लीटर पाण्यातून ठिबक सिंचनाद्वारे पिकाला द्यावे, शेणखत किंवा अन्य सेंद्रिय खत जमिनीत टाकावे, ही बुरशी हुमणी अळ्यांना रोगग्रस्त करते, सहा ते सात दिवसांत हुमणी अळी मरून पडते तसेच रासायनिक औषधांच्या वापराविषयी कोणत्या औषधांच्या फवारणी घ्यायच्या तसेच एखाद्या दिवशी शेतीला पाणी जास्त दिल्याने अळ्या गुदमरून मरतात, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे.
चौकट...
हे करतात किडीचा नायनाट...
हुमणीवर नियंत्रण ठेवणारे नैसर्गिक शत्रू महत्त्वाचे त्यामध्ये बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार आदी पक्षी हुमणी किडीचा नायनाट करतात.
२२ कोपर्डे हवेली
पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी पर्यवेक्षक पंडित मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी अजय पाटील उपस्थित होते.