पाटण : काठी, ता. पाटण येथे कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत फळबाग लागवड व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी तहसीलदार योगेश टोम्पे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार टोम्पे यांच्या हस्ते फळबाग लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, कृषी सहायक नितीन लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. नितीन लोखंडे यांनी आभार मानले.
कऱ्हाड तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी
कऱ्हाड : शहरासह तालुक्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गत आठवड्यात ढगफुटी झाली होती. त्यानंतर दोन दिवस पाऊस सुरू होता. मात्र, गत शनिवारपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. गुरुवारपर्यंत कडक ऊन पडत होते, तर शुक्रवारपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. भुईमूग व सोयाबीन यांसारख्या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. मात्र, तुरळक सरी वगळता पावसाने हुलकावणी दिल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
मसूरला शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण उत्साहात
मसूर : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मसूर शहर व विभाग तसेच शिवसेना कऱ्हाड उत्तरच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख सतीश पाटील, उपतालुकाप्रमुख दत्ता पवार, बाबासाहेब बनसोडे, विभागप्रमुख उद्धव घोलप, उपविभागप्रमुख गोरख पवार, राजेंद्र घाडगे, शरद कुंभार, मनोज जगदाळे, अतुल वैद्य, उदय वेल्हाळ, संतोष वेल्हाळ, रवींद्र शहा, रोहित भाटे, संजय जैन, अजय घाडगे आदी उपस्थित होते.
इंदिरा कन्या प्रशालेमध्ये योग दिन उत्साहात
मसूर : येथील इंदिरा कन्या प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी व पालकांना आॅनलाइन योग प्रात्यक्षिके प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका सुनीता नलवडे यांनी करून दाखवली. प्रभारी मुख्याध्यापक ए. बी. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एम. एस. पवार आदी उपस्थित होते. सुनीता नलवडे यांनी प्राणायामाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद केले. उपक्रमात पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनी व पालकांनी सहभाग नोंदवला.