मसूर : ग्रामपंचायत निवडणुकीत खराडे, चिखली येथे सत्ताधारी पॅनेलने सत्ता अबाधित राखली, तर निगडी, कोणेगाव, रिसवड, शिरवडे, नवीन कवठे याठिकाणी सत्तांतर झाले. कोणेगाव, चिखली येथे तिरंगी लढत होती, तर निगडीत एका अपक्षासह चौरंगी लढत झाली.
खराडे येथे हणमंतराव जाधव, आनंदराव बर्गे, शरद बर्गे, सुभाष जगन्नाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने सहा जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादीची सत्ता कायम राखली, तर विरोधी माजी उपसभापती आत्माराम जाधव यांच्या रयत पॅनेलला ३ जागांवर यश मिळवता आले. नवीन कवठेत जनसेवा पॅनेलने ४, यशवंत पॅनेलने २, तर सह्याद्री पॅनेलने बिनविरोध एका जागेवर विजय मिळवला. चिखलीत माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब चव्हाण व अजितराव पाटील यांच्या ज्योतिर्लिंग, येडोबासह जय हनुमान पॅनेलने ६ जागांवर विजय मिळवून सत्ता अबाधित ठेवली, तर विरोधी कुलदीप क्षीरसागर यांच्या सांजुबाई पॅनेलला ३ जागांवर यश मिळवता आले.
रिसवडला प्रकाश इंगवले व भीमराव इंगवले, महेश इंगवले यांच्या जय हनुमान पॅनेलने सत्तांतर घडवत ६ जागांवर विजय मिळवला. संपतराव इंगवले यांच्या जय हनुमान ग्रामविकास पॅनेलला ३ जागा मिळविता आल्या. कोणेगाव येथे प्रकाश चव्हाण, राजेंद्र पाटील, विकास चव्हाण यांच्या भैरवनाथ पॅनेलने सहा जागांवर विजय मिळवून सत्तांतर केले, तर महिपतराव चव्हाण, शिवाजीराव पाटील यांच्या सह्याद्री पॅनेलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
शिरवडेत मानसिंग जगदाळे, जगन्नाथ जगदाळे, सर्जेराव थोरात, बी. के. जगदाळे यांच्या जोतिर्लिंग पॅनेलने सात जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवले, तर सुहास बोराटे, सुभाष पवार, सुनील जगदाळे यांच्या सह्याद्री पॅनेलने चार जागांवर विजय मिळवला. शहापूर येथे आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून केवळ एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राजेंद्र शेलार यांनी बाजी मारली.
- चौकट
निगडीत निर्विवाद सत्तांतर
निगडी येथे चंद्रकांत ऊर्फ रसिक पाटील व दिनकर पाटील यांच्या जय हनुमान पॅनेलने आठ जागांवर विजय संपादन करीत निर्विवाद सत्तांतर घडवले, तर विद्यमान सरपंच आत्माराम घोलप यांच्या विकास आघाडी पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले. तिसरे पॅनेल व अपक्ष यांना खातेही उघडता आले नाही.