अंगापूर : वर्णे-आबापुरी, ता. सातारा येथील श्री काळभैरवनाथाची वार्षिक यात्रा उत्साहात पार पडली. ‘कालभैरवनाथाच्या नावानं चांगभलं,’चा जयघोष आणि गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीने यात्रेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांतील लाखो भाविकांनी काळभैरवानाचे दर्शन घेतले.यात्रेच्या आदल्या दिवशी हरिजागराचा कार्यक्रम झाल्यानंतर गुरुवारी यात्रेच्या मुख्य दिवस होता. दुपारी १२ वाजता शिवकळा अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत देवाच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात देवाचे सर्व चाकरमानी, मानकरी यांच्यासह पालखी सोहळा वाजत-गाजत डोंगरावरील मंदिराकडे गेला. तेथून सायंकाळी ५ वाजता छबिना काढण्यात आला. यानंतर वर्णे गावात पालखीची मिरवणूक झाली. यावेळी गावात रस्त्याच्या दुतर्फा तसेच मुख्य चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावातील ग्रामस्थ, भाविक या पालखीवर गुलाल-खोबरे वाहून दर्शन घेत होते. यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.हा भक्तिमय पालखी सोहळा रात्री आठ वाजता आबापुरीतील मुख्य मंदिराकडे पोहोचला. यावेळी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने फुलून गेला होता. रात्रभर भाविक मंदिरात काळभैरवनाथाचे दर्शन घेत होते. पहाटे ५.४५ वाजता हा पालखी सोहळा मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडला. पालखी मिरवणुकीत शिवकळा अधिकारी, सर्व मानकरी, सेवेकरी सासनकाठ्या घेऊन सवाद्य सहभागी झाले होते. चंद्रकांत बाबर व सहकाऱ्यांनी काळभैरवनाथाची कथा सांगितली. ‘काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं,’च्या गजराने व गुलाल, खोबऱ्याचा वर्षाव करत आबापुरी नगरी दुमदुमून गेली होती. भाविकांची गैरसोय न होण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, बोरगाव पोलिस ठाणे व वर्णे ग्रामस्थांनी यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)
गुलालाची उधळण; ‘चांगभलं’चा गजर
By admin | Published: March 24, 2017 11:39 PM