संदीप कुंभारमायणी : गुंडेवाडी गावाच्या नामांतरासाठी पाच वर्षांपासून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांतून परवानगी मिळाली असून, यापुढे गुंडेवाडी गावाचे ‘मराठानगर’ असे नामांतर करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.२०१७ मध्ये मराठा मोर्चादरम्यान या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी गुंडेवाडी ग्रामस्थांनी गावाचे नाव बदलून मराठानगर करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मंजूर केला होता. प्रस्ताव तालुकास्तरापासून केंद्रीय पातळीपर्यंत विविध शासकीय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. तेव्हापासून गावाचे नाव मराठानगर होईल, या प्रतीक्षेत येथील ग्रामस्थ होते.सप्टेंबर २०२२ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून गुंडेवाडी गावाचे मराठानगर नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयाला मिळाले. मात्र, तरीही ग्रामपंचायतीने कोणी तक्रार दाखल करील व पुन्हा या नामांतराला काही अडचण निर्माण होईल यासाठी ९० दिवस वाट पाहिली.
मात्र, तीन महिन्यांत कोणीही या नामांतरणाविरोधात तक्रार दाखल न केल्याने अखेर २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत गावाचे नामांतरण मराठानगर झाले असल्याचे घोषित केले. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाच वर्षांपासून उभारलेल्या लढ्याला यश आले असल्याची माहिती सरपंच दीपाली शरद निकम, उपसरपंच किसन निकम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.