जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गठीत करण्यात आलेल्या या समितीचे अध्यक्ष सरपंच आणि सहअध्यक्ष म्हणून तलाठी, तर सचिव म्हणून ग्रामसेवक जबाबदारी पार पाडणार आहेत. स्थानिक विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कृषी सहायक, आरोग्यसेवक, बचत गटाच्या ग्रामसंघ अध्यक्षा, महिला बचत गट सचिव, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्राथमिक शिक्षक, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, स्वयंसेवक या समितीचे सदस्य असणार असून ते समितीवर सोपवलेली जबाबदारी पार पाडणार आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निश्चित करण्यात आलेल्या प्रतिबंधत्मक उपाययोजना, नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेतून ग्रामस्तरीय समिती गठीत करुन कामकाज पार पाडणार आहे.
- चौकट
... तर कारवाई होणार!
नव्याने गठीत केलेल्या ग्रामस्तरीय समितीने सर्व जबाबदाऱ्या अचूक पार पाडायच्या आहेत. शिक्षकांनी त्यांच्या मुख्यालयी पूर्णवेळ उपस्थित राहणे बंधनकारक आहे. समितीस नेमून दिलेल्या कामकाजामध्ये कुचराई अगर कसूर झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होणार आहे.