खंडाळा : ‘आधुनिक काळात कचरा व पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. गावांची स्वच्छता राखण्यासाठी घरोघरी कचरा प्रकल्प राबविणे ही नावीन्यपूर्ण बाब आहे. गुठाळेचा घनकचरा प्रकल्प देशाला दिशादर्शक ठरेल,’ असा विश्वास केंद्रीय जलजीवन व अन्नप्रकिया उद्योगमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला.
गुठाळे, ता. खंडाळा येथील ग्रामीण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पाणीपुरवठा अभियंता किरण सायमोते, सभापती अश्विनी पवार, गटविकास माणिकराव बिचकुले उपस्थित होते.
पटेल म्हणाले, ‘महिलांना छोटे उद्योग निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. अन्नप्रक्रिया उद्योगात ३५ टक्के फायदा होईल. ग्रामीण भागात महिलांना ग्रामपंचायत पातळीवर पाणी शुद्धतेचे प्रशिक्षण दिले जाईल. पाणी वाचवले तर गावांना फायदा होईल. गुठाळेच्या तलावाच्या पाण्याची व्यवस्था मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले जाईल.’
उदय कबुले म्हणाले, ‘गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी महिलांनी एकत्रित काम केले. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावच्या समस्या दूर करण्यासाठी काम करता आले याचे समाधान आहे. घनकचरा प्रकल्पामुळे गावचा देशात नावलौकिक वाढेल.