रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे पोलिसांनी शनिवारी गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन जीप पकडल्या. त्यामधून ३७ हजार ३६ रुपये किमतीच्या गुटख्यासह तब्बल सात लाख ३७ हजार ३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाहनचालक बुड्डेसाहब नबीलाल मंदेवाली (वय २८), वाहनमालक कासीमसाहब यतुमनसाहब मंदेवाली (४५) व चालक बंदिगीसाहब इनामसाहेब मंदेवाली (३१, सर्व रा. नागावी केडी, शिंदगी, विजापूर) यांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांना विटा-सातारा राज्यमार्गावरून वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, शनिवार दि. २७ राेजी बसस्थानक येथील शिवराज चौकामध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली. रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास (केए २९ एन २८९९) व (केए ४८ एम ६६१२) या दोन संशयास्पद जीपगाड्या एकापाठोपाठ एक आलेल्या दिसताच पोलिसांनी दोन्ही गाड्या अडवल्या. त्यांची तपासणी केली. एका गाडीमध्ये १५ हजार ४० रुपयांचा गुटख्याचा साठा सापडला. तर, दुसऱ्या गाडीमध्ये २१ हजार ९९६ रुपयांचा गुटखा सापडला. प्रतिबंधित अन्नसाठा व वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तसेच दोन्ही गाड्या जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आल्या आहेत.
गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत, सहायक फौजदार विष्णू कुडे, पोलीस नाईक गणेश कदम, पोलीस कॉन्स्टेबल सागर भुजबळ, होमगार्ड आकाश कदम, सागर धोतरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
चौकट :
कारवाईचा घोडा चौफेर उधळू द्या
रहिमतपूर पाेलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या पकडल्या. ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु, रहिमतपुरातही मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री केली जाते. त्यावर पायबंद घालण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. यासाठी कारवाईच्या दणक्याचा घोडा आता चौफेर उधळून द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
फोटो २९रहिमतपूर-गुटखा
रहिमतपूर येथे जप्त केलेल्या गुटखा वाहतुकीच्या गाड्या पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. (छाया : जयदीप जाधव)