कऱ्हाड : तालुक्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आॅलिम्पिक स्पर्धेमधून भारताला कुस्ती प्रकारातील पहिले पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांची ही कर्मभूमी आहे. त्यानंतर पै. मारुती वडार, महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील आदींनीही ही परंपरा पुढे सुरू ठेवली. त्यामुळे या मातीतील अनेक मल्ल कुस्तीच्या फडात बाजी मारताना दिसतात. बालेवाडी येथे असोसिएशनने घेतलेल्या स्पर्धेमध्ये जखिणवाडीच्या हृतिक झिमरेने ८५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले. त्याची जॉर्जीया येथे होणाऱ्या वर्ल्ड पँके्रशन चॅम्पियनशिपसाठी निवड झालीय खरी; पण त्याच्या व पालकांसमोर प्रश्न उभा आहे तो यासाठी येणाऱ्या खर्चाचा, त्याला समाजातील दानशूरांनी मदतीचा हात दिला तर तो जॉर्जीयामध्ये कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्याशिवाय राहणार नाही. कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी हे एक छोटेसे गाव. या गावातील हृतिक भीमराव झिमरे हा विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिकतो. त्याचे आजोबा हिराबा झिमरे व चुलते दिनकर झिमरे हे दोघेही पैलवान. घरातल्या या ज्येष्ठांचा हा कुस्तीचा वारसा तो पुढे चालवत आहे. गावातल्या तालमीत सराव करत करत लहान-मोठ्या कुस्त्यांच्या फडात त्याने आजपावेतो अनेक बक्षिसे जिंकली आहेत. शालेय कुस्ती स्पर्धेतही तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने ८५ किलो वजनी गटात पहिलाच क्रमांक मिळविला आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही त्यावर मात करीत कुस्तीसारख्या क्रीडा प्रकारात त्याची चाललेली दमदार वाटचाल इतरांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. बालेवाडी पुणे येथे पाचवी नॅशनल ट्रॅडीशनल रेसलिंग अॅन्ड पँक्रेशन चॅम्पियनशिप स्पर्धा काही दिवसांपूर्वीच झाली. त्यात या जखिणवाडीच्या विद्यार्थी मल्लाने सुवर्ण पदक मिळविले. त्याची निवड जॉर्जीया येथे होणाऱ्या वर्ल्ड पँके्रशन चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. तेथे जाऊन ही कुस्ती स्पर्धा जिंकण्याची त्याची मनिष आहे; पण वडील भीमराव झिमरे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला स्पर्धेला पाठविण्यासाठी लागणारी सुमारे एक लाख तीस हजारांची रक्कम कशी जमा करायची या विवेंचनेने हतबल झाले आहेत. त्याला जर समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला. तर कऱ्हाड तालुक्यातला आणखीन एक चांगला मल्ल तयार करण्यासाठी हातभार लागेल, यात शंका नाही. जखिणवाडीने ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान आदी स्पर्धातील एकवीस पारितोषिके प्राप्त केली आहेत. हृतिक झिमरे सारख्या मुलांच्या यशामुळे गावच्या लौकिकात भर पडणार आहे. (प्रतिनिधी)
जखिणवाडीच्या मल्लाला हवीय मदतीचा हात!
By admin | Published: August 28, 2016 12:05 AM