पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या गारांच्या पावसाने काही क्षणात अक्षरशः परिसर गारामय झाला.गेले काही दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. बुधवारी सकाळपासुन अशी स्थिती असताना दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेत शिवारात काम करणाऱ्यांची तारांबळ उडाली.दरम्यान, परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याची गरज असलेल्या ऊस, आले व तत्सम पिकांना फायदा झाला असला तरी काढणी अवस्थेत असलेल्या पिकांचे गारांच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, कलिंगड कांदा बीजोत्पादन व तरकारी पिकांचे नुकसान गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झाले. काढणी स्थितीत असलेले व व्यापाऱ्यांशी करार पद्धतीने व्रिक्री सुरू असलेल्या कलिंगड व कांदा बिजोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती व तत्सम कारणांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. त्यातच परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची गरज आहे.राजेंद्र धुमाळ,व्हा.चेअरमन सोनके विकास सेवा सोसायटी