पुसेगाव : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुसेगाव परिसरात झालेल्या पावसाने दिलासा दिला. गारा, वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे दीड तास पुसेगाव व परिसराला चांगलेच झोडपून काढले.
जनावरांसाठी वर्षभर पुरेल अशा लावलेल्या कडब्याच्या गंजी झाकल्या नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
काही शेतकऱ्यांची नांगरट अजूनही झाली नसल्याने, वापसा येण्याची वाट पाहावी लागणार आहे, तसेच उन्हाचा तडाखा वाढल्याने गृहिणींनी सुरू केलेल्या उन्हाळी कामांना या पावसाने ब्रेक लागला आहे. चैत्राच्या कडक उन्हात वाळवण्यासाठी घातलेली ज्वारी व गहू यासारखी वाळवणे गोळा करताना, अचानक आलेल्या पावसाने लोकांची भंबेरी उडाली. जोरदार वाऱ्याने शेतातील अनेक झाडे उन्मळून पडली, तर जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. पुसेगाव परिसरात सध्या आले पिकाची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत करताना, या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे आले लागण ही पुढे ढकलली जाईल, अशी शक्यता आहे.