महाबळेश्वर: महाबळेश्वरसह परिसराला बुधवारी अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे सर्वत्र गारांचा खच पडला होता. रस्त्यांवर पांढऱ्या शुभ्र गारांची चादर पसरल्याने पर्यटकांसह स्थानिकांना काश्मीरची अनुभूती आली.महाबळेश्वर तालुक्यात वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहे. ढगाळ वातावरण त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत कमालीचा गारवा पसरला आहे. बुधवारी दिवसभर आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी व्यापून गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पावसाने महाबळेश्वरह परिसराला अक्षरश: झोडपून काढले.
ब्रिटिशकालीन ऑर्थरसीट पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर गारांचा खच पडला होता. रस्त्यावर पसरलेली पांढऱ्या शुभ्र गारांची चादर पाहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना काश्मीरची अनुभूती आली. अनेकांनी गाड्या थांबवून निसर्गाचा हा अनोखा अविष्कार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. अनेक हौशी पर्यटकांनी या बर्फात खेळण्याचा मनसोक्त आनंदही लुटला. गारपिटीमुळे क्षेत्र महाबळेश्वर ते ऑर्थरसीट या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, या पावसामुळे रात्री थंडीची तीव्रता अधिकच वाढली.