सातारा ,दि. ३१: परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा भाज्यांच्या दरांवर परिणाम परिणाम झाल्याने गृहिणींचे बजेट मात्र, कोलमडले आहे. मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या सर्वच भाज्या ३० रुपयाला एक तर पन्नास रुपये जोडी या दराने विक्री होत आहे. एकीकडे फळभाज्यांची आवक वाढली असली तरी पालेभाज्यांची आवक मात्र घटली आहे.
भाजी मंडईत गेल्या महिन्यात सर्वच प्रकारच्या फळ व पालेभाज्यांचे दर स्थिर होते. मात्र, परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने याचा सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसला. बाजारपेठेत उत्पादन कमी व मागणी अधिक असे चित्र निर्माण झाले असून, पालेभाज्यांचे दरही भलतेच कडाडले आहेत.
वीस रुपये जोडी या दराने विकली जाणारी मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या भाज्या आता पन्नास रुपये जोडी या दराने मिळत आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे पालेभाज्यांऐवजी फळभाज्यांना मागणी वाढू लागली आहे.
या आठवड्यात पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून पावटा, मटार, कोबी, फ्लॉवर, शेवगा, भोपळा, बटाटा, वांगी, ढोबळी मिरची या भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.