लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅमच्या रोहित भोसले आणि शंतनू करांडे यांची अमेरिकेतील ग्रेटर लॉस एंजेलिस अमेचर रेडिओ या संस्थेमध्ये प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीप्रसंगी दूरसंचार यंत्रणा कोलमडण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यावेळी मदतकार्य मिळविण्यासाठी ‘हॅम रेडिओ’ची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. नुकतेच भारतामध्ये तौक्ते आणि यास चक्रीवादळांनी धुमाकूळ घातला. तसेच जपानमध्ये आलेली त्सुनामी असो की केरळमधील पूरपरिस्थिती, या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये ‘हॅम रेडिओ’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपत्कालिन परिस्थितीत हॅम रेडिओच्या माध्यमातून एकमेकांना संपर्क साधून मदत मिळवता येते व मदत पोहोचवताही येते.
भारतामध्ये हॅम रेडिओधारकांची संख्या वाढविण्यासाठी सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅमच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये येथे हॅम रेडिओ कार्यशाळेचे मोफत आयोजन केले जाते. त्यांच्या कार्याची दाखल घेत हॅम ऑपरेटर रोहित भोसले आणि शंतनू करांडे यांची ग्रेटर लॉस एंजेलिस अमेचर रेडिओ या संस्थेमध्ये प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. त्याचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भारतामध्ये राहून अमेरिकेन हॅम रेडिओ अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन अमेरिकन हॅम रेडिओ लायसन्सची आंतरराष्टीय परीक्षा देता येणार आहे, असे सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॅमच्या अध्यक्ष कोमल भोसले यांनी सांगितले.
फोटो : आयकार्ड
फोटो ०१, फोटो ०२