सातारा : कोरोना विषाणू संकटासाठी आरोग्य विभागात कंत्राटी स्वरूपात नोकरी मिळालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा घाट रचला जात आहे. याच्या विरोधात कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेच्या सातारा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना विषाणू काळात अनेकांना कंत्राटी स्वरूपात नोकरी मिळाली. हे कंत्राटी कर्मचारी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांना आता सेवेतून कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्यातच जिल्ह्यात अजूनही कोरोनाची दुसरी लाट सुरूच आहे. तर तज्ज्ञांच्या मते सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे. कोरोना भरतीत नोकरी मिळालेले हे योध्दे चांगली सेवा करत आहेत. त्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची गरज आहे.
सातारा जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना केवळ निधीअभावी कोणाही एकाला सेवेतून कमी केल्यास कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेच्या वतीने रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देताना कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीनिक काळे, सहसंयोजक सोहेल पठाण, विराज शेटे, जिल्हा कार्यकारिणीमधील उमेश गायकवाड, डॉ. विशाल वीरकर, सूरज शिंदे, सुषमा चव्हाण, गौरी भोसले, प्रज्ञा गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो दि.२८सातारा कोरोना योध्दे फोटो मेल...
फोटो ओळ : सातारा येथे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेच्या वतीने शासकीय सेवेत कायम करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी कंत्राटी कर्मचारी एकत्र आले होते. (छाया : जावेद खान)
...............................................................