आदर्की : फलटण-कोरेगाव तालुक्याच्या सिमेवर असलेल्या हणमंतवाडी धरण क्षेत्रात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे एक तास या भागाला पावसाने झोपडूप काढले. पहिल्याच पावसात हणमंतवाडी धरण तुडुंब भरून वाहिल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
फलटण व कोरेगाव तालुक्याच्या सिमेवर १९५२ रोजी तत्कालीन बांधकांम मंत्रीमालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हणमंतवाडी धरणाची उभारणी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते या धरणाचे भूमीपूजन झाले होते. हे धरण पूर्णत: गाळाने भरले होते. तर चार फुट सांडवा वाहून गेल्याने धरणाच पाणीसाठा होत नव्हता; परंतु तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांच्या सेस फंडातून सांडव्याची दुरुस्ती करून सांडव्याची उंची वाढवण्यात आली व धरणातील गाळही काढण्यात आला.
खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली असतानाच आदर्की, वाठार, तडवळे परिसरात एक तास मुसळधार पाऊस झाला. पहिल्याच पावसात हणमंतवाडी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहिल्याने शेतकरी सुखवला आहे.
फोटो : १२ निंबाळकर
हणमंतवाडी ( आदर्की खुर्द ) ता . फलटण येथील हणमंतवाडी धरण पूर्ण क्षमतेने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)